मोरोक्को देश भूकंपाने हादरलं आहे. मोरोक्कोला ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. यात इमारती कोसळल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर, ६३२ जणांचा मृत्यू आणि अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी पहाटेच्या सुमारास मोरोक्कोत भूकंपाने हाहाकार माजवला. पहाटे ६.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के मोरोक्कोत बसले. यानंतर मोरोक्कोत अनेक इमारती कोसळल्या. यामध्ये ६३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३२९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भूकंपानंतर प्रशासनाकडून बचावकार्यास सुरूवात करण्यात आली आहे.
हेही वाचा : विश्लेषण: भूकंप येणार हे कुत्र्या-मांजरांना व इतर प्राण्यांना माणसांच्या आधीच कसं कळतं?
भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या मारकेश शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, मारकेशपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
मोरोक्कोतील भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर पंतप्रधान मोदी म्हणाले, “मोरोक्कोतील भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. हे वृत्त ऐकून दु:ख झालं आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या संवेदना मोरोक्कोतील लोकांबरोबर आहेत. या कठिण काळात मोरोक्काला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी भारत तयार आहे.”