गेल्या काही दिवसांपासून देशभरात करोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटची चर्चा पाहायला मिळत आहे. करोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे नागरिकांमध्ये भीतीयुक्त चर्चा सुरू झालेली असताना केंद्र सरकारने काळजी करण्याचं कारण नसल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यांना दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी माध्यमांना दिली. तसेच, यासंदर्भात सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी चर्चा केल्याचंही त्या म्हणाल्या.
काय म्हणाल्या भारती पवार?
JN.1 या नव्या व्हेरिएंटसंदर्भात केंद्र सरकारकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, त्याबाबत भारती पवार यांनी भूमिका मांडली. “करोनाच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात याआधीच केंद्र सरकारकडून मनसुख मांडवीय यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांबरोबर बैठक घेतली आहे. त्याशिवाय सर्व राज्यांना आवश्यक ते निर्देशही दिले आहेत. त्यात स्पष्ट म्हटलं आहे की जिथे कुठे करोना रुग्णांचं स्क्रीनिंग चालू आहे तिथे जिनोम सिक्वेन्सिंगही केलं जावं. मला वाटतं प्रत्येक राज्यात चाचण्या वाढवल्या आहेत आणि जिनोम सिक्वेन्सिंगवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत”, असं भारती पवार म्हणाल्या.
“ज्येष्ठ नागरिकांनी थोडी काळजी घ्यावी”
“सध्या सुट्ट्या चालू आहेत. त्यामुळे थोडी काळजी घ्यायला हवी. घाबरण्याचं कारण नाही. हा एक सबव्हेरिएंट आहे. त्यामुळे याची चिंता करण्याचं कारण नाही. पण तरीही थोडं सतर्क राहायला हवं. जे रुग्ण उपचार घेत आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी थोडी काळजी घ्यायला हवी. यासंदर्भात राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत”, असं भारती पवार यांनी नमूद केलं.
“घाबरण्याचं कारण नाही. पण आपण सतर्क राहायला हवं. आपण आधी करोनाचा सामना केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे की प्रोटोकॉल काय असतात. कशा प्रकारे आपण वागायला हवं, काळजी घ्यायला हवी हे सगळ्यांना माहिती आहे”, असंही त्या म्हणाल्या.