डासांमुळे अनेक रोग माणसाला होतात पण हे डास नेमके माणसाला शोधून त्याचे रक्त कसे पितात याचे कोडे आता उलगडले आहे, डास हे त्यांचे मानवी लक्ष्य बहुसंवेदकतेने शोधतात. त्यात वास, दृश्य संकेत, शरीराचे तपमान यांचा समावेश असतो. त्यामुळेच ते माणसाजवळ येऊन रक्त पिऊ शकतात, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेत हे संशोधन करण्यात आले आहे.
डासांना दूर ठेवण्यासाठी आपण सिट्रोनेला कँडल्स पेटवतो किंवा गुडनाइट व इतर उत्पादने वापरतो, ओडोमास अंगाला चोपडतो पण त्यामुळे डास काही काळच दूर राहू शकतात कारण त्याच्या तिप्पट असा धोका दृश्य, वास, तपमान या तीनही संवेदक घटकांच्या बाबतीत ते पचवू शकतात, त्यामुळे ते माणसावर पुन्हा तुटून पडतात असे संशोधकांचे म्हणणे आहे. डासाची मादी चावते. नर चावत नाही, डासाची मादी तिच्या पिलांना रक्त हे अन्न म्हणून देते, ती नेहमी यजमान म्हणजे माणूस रक्त पिण्यासाठी शिकार म्हणून शोधत असते.
अनेक डास माणूस जो कार्बन डायॉक्साइड बाहेर टाकतो, त्याच्या वासाने जवळ येतात. जवळ असलेल्या माणसाकडून त्याला इतरही संकेत मिळतात, माणसाला गाठण्यासाठी ते दृश्य व तपमान संवेदकांचाही वापर करतात. डास कुठल्या वेळी कुठल्या संवेदकाचा वापर करतात याचेही संशोधन केले गेले. त्यात भुकेल्या मादी डासांना एका बोगद्यात टाकण्यात आले व तेथे वास, तपमान व इतर संवेदनशील घटक नियंत्रित करण्यात आले. बोगद्यात कार्बन डायॉक्साइड सोडून माणसाच्या उच्छ्वासासारखी स्थिती निर्माण करण्यात आली असता डासांचे वर्तन बदलले होते. प्रत्येक घटक नियंत्रित करून वीस डास हवायुक्त बोगद्यात टाकले असताना त्यांचे व्हिडिओ कॅमेरे व थ्री डी ट्रॅकिंग तंत्राने वर्तन तपासण्यात आले व त्यावरून ते कसे फिरतात याचे एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. त्यामुळे डास वेगवेगळ्या अंतरावरचे लक्ष्य कसे शोधतात याचे प्रारूप तयार करण्यात यश आले आहे. माणसाने सोडलेल्या कार्बन डायॉक्साइडची संवेदना डासाला १० ते ५० मीटर अंतरावर जाणवते. दृश्यात्मक पातळीवर डास जेव्हा माणसाला शोधतो, तेव्हा त्याला ५ ते १५ मीटर जवळ यावे लागते. नंतर तो आणखी जवळ आल्याने त्याला मानवी शरीराच्या तपमानाची चाहूल लागते, हे सगळे एक मीटर अंतराच्या आत घडते. विविध संवेदनातील माहिती त्यांच्या मेंदूत कशी एकत्र होते व योग्य निर्णय कसा घेतला जातो, हे मेंदूशास्त्राच्या दृष्टीने एक कोडे आहे, असे या संशोधनाचे प्रमुख मायकेल डिकिन्सन यांचे मत आहे. त्यांच्या मते मादी डास अतिशय सहजतेने माणसाला शोधतात, कार्बन डायॉक्साइडचा वास आल्यानंतर ते दृश्य संकेत शोधतात, त्यांचा अंदाज कधीही चुकत नाही. कीटकांच्या वर्तनावरचे हे नवे संशोधन असून त्यातून डासांना पकडण्यासाठी आणखी काही युक्तया कंपन्या शोधून काढू शकतील. हे संशोधन ‘करंट बायॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
डास माणसाकडे येण्याची कारणे
’कार्बन डायॉक्साइडचा वास
’दृश्य संवेदना
’शरीराचे तपमान