जगभरात आणि विशेषत: भारतात MeToo चळवळ जोर धरत असताना एका सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर आली आहे. ७८ टक्के महिला आपल्यावर कामाच्या ठिकाणी झालेल्या अत्याचाराबाबत वाच्यता करत नसल्याचे या ऑनलाईन सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये लैंगिक संबंधांबरोबरच आक्षेपार्ह स्पर्श करणे या गोष्टी कामाच्या ठिकाणी अतिशय सामान्य असल्याचे यातून समोर आले आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटादरम्यान नाना पाटेकर यांनी केलेल्या गैरवर्तणुकीला २००८ मध्ये वाचा फोडली होती, त्यावेळी हे सर्वेक्षण करण्यात आले होत.
कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार याबाबतची व्याख्या नक्की केल्यानंतर त्यावेळी २८ हजार महिलांनी या सर्वेक्षणावर प्रतिक्रिया दिली होती. यातील ५० टक्के महिलांनी लैंगिक अत्याचार आणि आक्षेपार्ह स्पर्श हा कामाच्या ठिकाणी अतिशय सामान्य असल्याचे मत व्यक्त केले. तर ३१ टक्के महिलांनी आपल्यावर अश्लिल शेरेबाजी झाल्याचे किंवा अश्लिल गोष्टींचे प्रदर्शन झाल्याचे म्हटले. तर १९ टक्के जणींनी आपल्याला थेट लैंगिक सुखाची मागणी झाल्याचे नोंदवले. कामाच्या तासांशिवाय महिलांना या अशाप्रकारच्या गैरवर्तणुकीचा सामना करावा लागला असेल असे सामान्यपणे आपल्याला वाटते. मात्र ५० टक्के महिलांना कामाच्या वेळातच या परिस्थितीचा सामना करावा लागला. तर २० टक्के महिलांना ऑफीसशिवाय असणाऱ्या ऑफीसच्या कार्यक्रमात या गैरवर्तणुकीला सामोरे जावे लागले.
आपल्याशी चुकीची वर्तणूक केल्यानंतर केवळ २२ टक्के महिलांनी ऑफीसच्या व्यवस्थापनाकडे किंवा ह्युमन रिसोर्सेस विभागाकडे याबाबतची तक्रार केली. तर ७८ टक्के महिलांनी आपल्याशी झालेल्या गैरवर्तणुकीची आपण वाच्यता केली नसल्याचे म्हटले. त्यामुळे एकूणच महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत बोलण्यास घाबरतात हेच या सर्वेक्षणातून समोर येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांची नावे यामध्ये समोर आली असली तरीही सामान्य महिलांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचेच यानिमित्ताने स्पष्ट होते.