भारताच्या स्वातंत्र्य चळवळीदरम्यान क्रांतिकारकांनी जन्माला घातलेल्या अनेक घोषणा आणि देशभक्तीपर गीते आजही लोकप्रिय आहेत. यापैकी अनेक गाणी तर अवीट गोडीची असून स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य नसेल तरी संगीतप्रेमींकडून ही गाणी आवर्जून ऐकली जातात. सध्या देशात सुरू असलेल्या ‘आपले’ आणि ‘परके’ वादाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे (आप) नेते प्रशांत भूषण यांनी या सगळ्यामधील एक दुर्लक्षित पैलू समोर ठेवला आहे. प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्वातंत्र्यलढ्यात लोकप्रिय ठरलेल्या काही घोषणांची आणि देशभक्तीपर गीतांची यादी प्रसिद्ध केली आहे. योगायोग म्हणजे यापैकी अनेक घोषणा आणि देशभक्तीपर गीतांचे निर्माते या मुस्लिम व्यक्ती आहेत. हाच धागा पकडत प्रशांत भूषण यांनी तथाकथित राष्ट्रवादी आणि हिंदूत्त्ववादी संघटनांवर निशाणा साधला आहे. सध्या तावातावाने बोलणाऱ्या हिंदूत्त्ववादी संघटना स्वातंत्र्यलढ्याच्यावेळी जन्मालाही आल्या नव्हत्या, अशी टीका प्रशांत भूषण यांनी केली आहे. दरम्यान, प्रशांत भूषण यांनी प्रसिद्ध केलेली स्वातंत्र्यलढ्यातील घोषणा आणि देशभक्तीपर गीतांची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
* “मादरे वतन भारत की जय” ही घोषणा अजीमुल्ला खाँ यांनी दिली होती.
* ‘जय हिंद’ ही घोषणा आबिद हसन सफरानी यांनी दिली होती.
* ‘इन्कलाब झिंदाबाद’ ही घोषणा प्रसिद्ध उर्दू कवी हसरत मोहानी यांनी दिली होती.
* ‘भारत छोडो’ हे घोषवाक्य युसूफ मेहर अली यांची निर्मिती होय.
* युसूफ मेहर अली यांनीच ‘सायमन गो बॅक’ ही घोषणा दिली होती.
* ‘सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है’ हे देशभक्तीपर गीत बिस्मिल अज़ीमाबादी यांनी लिहले आहे.
* ‘तराना-ए-हिन्दी’ आणि ‘सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा’ ही गीते ख्यातनाम कवी अलमा इकबाल यांनी लिहली आहेत.
* भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याच्या निर्मितीत सुरय्या तय्यबजी यांचे मोठे योगदान आहे.
Most of the revolutionary slogans & songs coined in Indep struggle were created by Muslims.The Hindutva groups did not even fight for Indep! pic.twitter.com/RQd6UHal8G
— Prashant Bhushan (@pbhushan1) July 23, 2017
(ही सर्व माहिती अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक व अध्यक्ष अली नदीम रिझवी यांनी दिल्याचे प्रशांत भूषण यांचे म्हणणे आहे.)