आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका महिलेनं आपल्या पोटच्या मुलाच्या हत्येची सुपारी दिली. तिने आपल्या मुलाच्या जीवाचा सौदा एक लाख ३० हजार रुपयांत केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह अन्य तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
कनका दुर्गा असं अटक केलेल्या मुख्य आरोपी महिलेचं नाव असून ती काकीनाडा जिल्ह्याच्या करपा मंडल गावातील रहिवासी आहे. आरोपी कनका दुर्गाने आपला मुलगा वीर वेंकट शिवप्रसादच्या हत्येची सुपारी दिली होती. मुलगा शिवप्रसाद दारू पिऊन मारहाण करतो. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली.
हेही वाचा- “प्यार किया तो डरना क्या”, धावत्या दुचाकीवर जोडप्याचा फिल्मीस्टाइल रोमान्स, VIDEO व्हायरल
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, मुलगा शिवप्रसाद याचं लग्न झालं असून तो वाहनचालक म्हणून काम करतो. तो आपल्या बायकोसह आईसोबत राहत होता. पण कालांतराने त्याचा बायकोशी वाद सुरू झाला. यातून शिवप्रसाद दारुच्या आहारी गेला. तो दररोज रात्री दारू पिऊन घरी यायचा आणि आई कनका दुर्गा यांना मारहाण करायचा. मागील अनेक दिवसांपासून तो आईचा छळ करत होता. सततच्या त्रासाला कंटाळून आई कनका दुर्गा यांनी मुलगा शिवप्रसादच्या हत्येचा कट रचला.
हेही वाचा- मोठी बातमी! माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या गाडीला अपघात; डंपरने दिली मागून धडक
त्यांनी तीन आरोपींना एक लाख ३० हजार रुपयांची सुपारी दिली. संबंधित आरोपींनी बिक्काहोल परिसरात शिवप्रसादवर लोखंडी रॉडने हल्ला केला. यानंतर आरोपींनी शिवप्रसाद मृत झाल्याचं समजून देह तिथेच टाकून पळ काढला. पण काही वेळाने त्या परिसरातून जाणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याने शिवप्रसादला पाहिलं. त्याने तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. जखमी शिवप्रसाद याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे.