पत्नीचा खून करण्यासाठी रचलेल्या कटात सासूचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पतीने पत्नीचा खून करण्यासाठी दरवाजाला इलेट्रिक वायर जोडली होती. पण पत्नीऐवजी चुकून ५५ वर्षीय सासूने दरवाजाला हात लावला आणि मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला दारुचं व्यसन आहे. त्याचं सतत पत्नीशी भांडण होत होतं. रविवारी रात्री भांडण झाल्यानंतर पत्नी रागाने आपल्या माहेरी निघून गेली होती. यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीचा खून करण्याचं ठरवलं. पत्नीच्या घरी पोहोचल्यानंतर त्याने लोखंडापासून तयार केलेल्या दरवाजाला इलेक्ट्रिक वायरने जोडले. पण यावेळी पत्नीऐवजी चुकून सासू दरवाजाच्या संपर्कात आली आणि मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपीने पळ काढला आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.