Son Kills Mother: भारतात रोजच अनेक गुन्ह्यांच्या घडत येत असतात. मात्र काही घटना या मन सुन्न करणाऱ्या असतात. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. स्पीकर दुरुस्तीसाठी वीस हजार रुपये दिले नाहीत आणि वर अपमान केला म्हणून रागावलेल्या मुलाने आईचा खून करण्याचा डाव आखला. आरोपीचे नाव मोहित असून त्याने दोन मित्रांच्या मदतीने ५५ वर्षीय संगीता त्यागी यांचा खून केला. पोलिसांनी आता आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहितने ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता आई काम करत असलेल्या कंपनीत गेला आणि घरी सोडण्याच्या बहाण्याने त्याने आईला दुचाकीवर बसविले. त्यानंतर एका निर्जन स्थळी नेऊन तिचा खून केला.

संगीता त्यागी या कापड कारखान्यात काम करतात. ४ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह मंडोला गावातील शेतात आढळून आला. हे ठिकाण संगीता यांच्या कारखान्यापासून ३०० मीटर अंतरावरच होते. संगीता यांना दोन मुले आहेत. मनीष आणि मोहित अशी त्यांची नावे आहेत. मनीष हा दिल्लीत सुरक्षा रक्षकाचे काम करतो. तिथे तो पत्नी आणि त्याच्या मुलांसह राहतो. तर मोहित हा डीजे ऑपरेटर आहे. संगीताचा नवरा सुनील हा प्रॉपर्टी केअरटेकर म्हणून काम करतो.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मोहितने आईकडे स्पीकरची दुरूस्ती करण्यासाठी २०,००० रुपये मागितले होते. पण आईने तर पैसे दिलेच नाहीत, उलट त्याचा पाणउतारा केला. तसेच घर आणि इतर संपत्ती मोठा मुलगा मनीषच्या नावावर करणार असल्याची धमकीही आईने दिली. मोहित हा गंभीरपणे कोणतेही काम करत नाही, असा तिचा आरोप होता.

मित्रांनी हात पकडले, मुलाने डोक्यात विट घातली

आईने अपमान केल्यानंतर मोहित रागातच होता. २ ऑक्टोबर रोजी मंडोला येथे मद्याच्या दुकानात गेला असता तिथे त्याला सचिन त्यागी आणि अंकित हे दोन मित्र भेटले. मित्रांसमोर मोहितने आपली कैफियत सांगितली. तिघांनी भरपूर मद्यप्राशन केले. माझ्या आईची हत्या करण्यासाठी तुम्ही मदत करा, अशी विनवणी मोहितने मित्रांकडे केली. दुसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर रोजी मोहितने सचिन त्यागीची दुचाकी घेतली आणि तो आईला आणायला कारखान्यात गेला. तिथून तिला घेऊन येत असताना रस्त्यातच तिचा खून केला. यावेळी दोन्ही मित्रांनी आईचे हात पकडून ठेवले होते. तर मोहितने आईच्या डोक्यात विट टाकून तिचा खून केला.

पोलिसांनी मोहित आणि त्याच्या दोन्ही मित्रांना अटक केली आहे. तसेच जी दुचाकी वापरली गेली, तीही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी तिघांवर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १०३ अन्वये खूनाचा गुन्हा दाखल केला.