आपल्या आईने आपल्याला ४ लाख रुपयांना विकलं आहे. मला त्या माणसापासून वाचवा असं म्हणत एका १८ वर्षांच्या मुलीने पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. या मुलीने हा आरोप केला आहे की माझ्या आईने ज्या व्यक्तीशी माझं लग्न लावून दिलं त्याने मला मारहाण केली आणि बेकायदेशीर गोष्टी करायला लावल्या. यासाठी या तरुणीने आता पोलिसांची मदत मागितली आहे. ही मुलगी गोरखपूरच्या महेसराची आहे. तिने आपल्या आईने आपल्याला हरियाणातल्या एका व्यक्तीला चार लाखांना विकलं असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलीस अधीक्षक (गोरखपूर उत्तर विभाग) मनोज अवस्थी यांनी सांगितलं, “पीडित मुलीने आमच्याशी संपर्क साधला आणि ती महेसरा भागातली रहिवासी असल्याचं सांगितलं. तसंच माझ्या आईने मला चार लाख रुपयांना विकलं आणि त्याच्याशी लग्न लावून दिलं असा आरोप केला आहे. या मुलीने जी तक्रार केली आहे त्यात तिने हा आरोप केला आहे. २३ नोव्हेंबरला घरगुती कार्यक्रमात दोघांचं लग्न लावून देण्यात आलं असंही या मुलीने तक्रारीत म्हटलं आहे.” एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
या प्रकरणी चिलुआताल पोलीस स्टेशनचे अधिकारी संजय मिश्रा म्हणाले, “१८ वर्षांच्या या मुलीने जे आरोप केले आहेत त्यांची चौकशी आम्ही करतो आहोत. या मुलीच्या दोन बहिणींची लग्नंही हरियणातच झाली आहेत. दुसरीकडे तिच्या आईने आणि तिच्या इतर कुटुंबीयांनी या मुलीचे आरोप फेटाळले आहेत. आम्ही या प्रकरणाचे सगळेच पैलू तपसातो आहोत. ” असं संजय मिश्रा यांनी म्हटलं आहे.
मुलीचे आरोप काय आहेत?
या सगळ्या प्रकरणात मुलीने असं म्हटलं आहे की तिची आई आणि तिची एक मैत्रीण या दोघीही बेकायदेशीर काम करतात. तसंच कुठल्यातरी विशिष्ट हेतूने गरीब मुलींचं लग्न हरियाणात करुन देतात. या मुलीने तिच्या आईची तक्रार करताना हे म्हटलं आहे की, “माझी आई आणि आमच्या घराशेजारी राहणारी तिची मैत्रीण गरीब कुटुंबातल्या मुलींचं लग्न हरियणात करुन देतात. मला एकूण सहा बहिणी आहेत त्यापैकी दोघींचं लग्न आधीच झालं आहे. काही दिवसांपूर्वी चार लाख रुपयांच्या मोबदल्यात माझं लग्न हरियाणातल्या एका तरुणाशी करुन देण्यात आलं. मात्र नंतर मला समजलं की माझं लग्न झालेलं नाही मला विकण्यात आलं आहे. मला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न झाला.” असंही या मुलीने म्हटलं आहे.