नोबेल पुरस्कार विजेत्या संत मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेवर नवजात अर्भकांच्या विक्रीचा आरोप झाला आहे. झारखंड सरकारने या आरोपांची दखल घेत चौकशी सुरु केली आहे. फसवणूक झालेल्या एका जोडप्याने तक्रार केल्यानंतर सरकारच्या बाल कल्याण समितीने चौकशी सुरु केली.
मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या कर्मचाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील एका जोडप्याला मूल विकले होते. पण काही दिवसांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीने विकलेले मूल पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. १४ दिवसांचे हे मूल मिशनरी ऑफ चॅरिटीकडून घेताना या जोडप्याने १.२० लाख रुपये मोजले होते. आपली फसवणूक झालीय हे लक्षात आल्यानंतर या जोडप्याने रांचीच्या बाल कल्याण समितीकडे मदर तेरेसांच्या संस्थेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.
या प्रकरणी एका महिला कर्मचाऱ्याला अटक झाली आहे. अन्य दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. अनिमा इंदवार असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ती निर्मल ह्दय येथे काम करते. निर्मल ह्दय मिशनरीज ऑफ चॅरिटीचा एक भाग आहे. मिशनरीज ऑफ चॅरिटीतर्फे अविवाहित मातांसाठी आश्रय गृह चालवले जाते. या आश्रय गृहातील एका महिलेच्या पोटी जन्माला आलेले मूल विकल्याचा काही कर्मचाऱ्यांवर आरोप आहे.
रांचीमधल्या बाल कल्याण समितीच्या प्रमुख रुपा वर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन अनिमा इंदवारला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील जोडप्याने एक मे रोजी १.२० लाख रुपये मुलासाठी भरल्यानंतर त्यांना १४ मे रोजी मिशनरीज ऑफ चॅरिटीकडून मुलाचा ताबा मिळाला. त्यानंतर या जोडप्याला काही प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत असे सांगून पुन्हा एक जुलैला निर्मल ह्दयमध्ये बोलवून घेण्यात आले. तिथे आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्या मुलाला आपल्या ताब्यात घेतले व पुन्हा या जोडप्याकडे सोपवलेच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संस्थेविरोधात तक्रार दाखल केली.