गोरगरिबांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या मदर तेरेसा यांना लवकरच संतपद बहाल करण्यात येणार आहे. तेरेसा यांनी केलेल्या दुसऱ्या चमत्कारावर शिक्कामोर्तब झाल्याने त्यांना रोमन कॅथॉलिक चर्चच्या वतीने संत म्हणून घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ख्रिश्चनांच्या सर्वोच्च धर्मपीठाचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनमधील धर्माचार्याना या संदर्भातील प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहे.
तेरेसा यांनी आपल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ या संस्थेमार्फत गरीब, अनाथ आणि गरजूंची निरलसपणे सेवा केली. या कार्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. पोप जॉन पॉल (द्वितीय) यांच्या काळात २००३ मध्ये तेरेसा यांना संतपदाने सन्मानित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. संतपद घोषित होण्याच्या प्रक्रियेत संबंधित व्यक्तीने दोन चमत्कार केल्याचे सिद्ध व्हावे लागते. तेरेसा यांचा पहिला चमत्कार सिद्ध झाल्याचे व्हॅटिकन चर्चने २००२ मध्ये जाहीर केले होते.
तेरेसा यांनी विविध विकारांनी त्रस्त असलेल्या एका बंगाली महिलेला, तर एका ब्राझिलियन व्यक्तीला बरे केल्याचे व्हॅटिकनने म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तेरेसा यांना जाहीर झालेल्या संतपदाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा