दैनंदिन आयुष्यात आपण संगणकावर किती वेळ घालवतो? या प्रश्नााचे उत्तर व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे असेल. मात्र, या उत्तरात एक समान धागा असेल, तो म्हणजे माऊसच्या वापराचा. आता हा माऊस आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे. या माऊसला त्याची स्वतची अशी एक कुळकथा आहे. या कुळकथेचे सूत्रधार अर्थात माऊसचे जन्मदाते, डग्लस एंजलबर्ट (८८) यांचे गुरुवारी निधन झाले. माऊस पोरका झाला. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या एंजलबर्ट यांनी कॅलिफोर्नियातील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
माऊसची जन्मकथा
टचस्क्रीन, टॅबलेट पीसी, स्मार्टफोन या नित्यनव्या गॅजेट्सच्या धबडग्यात आताशा माऊसचा वापर कमी होत चालला आहे. मात्र, असे असले तरी आज जगातील कोटय़वधी संगणक वापरकर्ते माऊसचा वापर करतातच. आता जो माऊस वापरला जातो तो उत्कांक्रित होऊन आलेला आहे. किंबहुना जगाला संगणक, इंटरनेट, ई-मेल असे शब्दही माहीत नसतील अशा काळात माऊसला जन्म दिला तो एंजलबर्ट यांनी.
३० जानेवारी १९२५ रोजी जन्मलेल्या एंजलबर्ट यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली ती स्टॅनफोर्ड संशोधन संस्थेतून (आताची एसआरआय इंटरनॅशनल).  या संस्थेतच त्यांनी जगातील पहिलावहिला माऊस तयार केला.
एंजलबर्ट यांनी हा माऊस तर तयार केला परंतु त्याचे स्वामित्वहक्क त्यांना मिळाले १९७० मध्ये. एंजलबर्ट यांनी १९५७ मध्ये एसआरआयमध्ये उमेदवारी सुरू केली. त्यानंतर १९५९ ते १९७७ या १८ वर्षांच्या कालावधीत त्यांनी एसआरआयच्या ऑगमेंटेशन रिसर्च सेंटरचे नेतृत्व केले. याच काळात त्यांनी अर्पानेटचा शोध लावला, जे की इंटरनेटचे प्राथमिक रूप ठरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कमनशिबी
एंजलबर्ट यांनी १९७० मध्ये माऊसची निर्मिती केली खरी. मात्र, त्याला खरी लोकप्रियता मिळायला सुरुवात झाली ती ८०च्या उत्तरार्धात. १९८७ मध्ये माऊस हे ‘पब्लिक डोमेन’ झाले. इंगलबार्ट यांनी १९७० मध्ये माऊसचे स्वामित्त्वहक्क मिळवले असले तरी १७ वर्षांच्या कालावधीत त्याचा फारसा वापर झाला नाही. आणि १९८७ पासून त्याला तुफान लोकप्रियता मिळाली त्यामुळे माऊसच्या वापरावरील रॉयल्टी इंगलबार्ट यांना मिळू शकली नाही. या बाबतीत ते कमनशिबीच ठरले. ८०च्या उत्तरार्धात जगभरात तब्बल एक अब्ज माऊसची विक्री झाली होती!

माऊसची उत्क्रांतकथा
ट्रॅकबॉल
टॉम क्रॅन्स्टन, फ्रेड लाँगस्टाफ आणि केन्यॉन टेलर या तिघांनी १९५२ मध्ये ट्रॅकबॉल नावाचा माऊस तयार केला. मात्र, त्याचा वापर कॅनेडियन नौदलासाठीच झाल्याने त्याचे स्वामित्वहक्क नोंदवले नव्हते.
माऊस
डग्लस एंगलबार्ट यांनी १९६३ मध्ये तयार केलेला पहिला माऊस हा लाकडी पेटीत बंद असलेल्या दोन चाकांचा होता. त्या पेटीवर एक कळ लावण्यात आली होती.
मेकॅनिकल माऊस
१९६८ मध्ये टेलिफुंकेन या जर्मन कंपनीने मेकॅनिकल माऊसची निर्मिती केली. मात्र, त्याचे स्वामित्त्वहक्क नोंदवले नाहीत. या माऊसमध्ये दोन लहान आकाराचे चेंडू बसवून त्याला ‘रोलिंग’ केले.
ऑप्टिकल माऊस
ऑप्टिकल माऊसची निर्मिती हा माऊसच्या उत्क्रांतकथेतील खूप पुढचा टप्पा ठरला. जगातील निम्म्याहून अधिक माऊस ़़य़ाच प्रकारातील आहेत.

सध्या वापरात असलेले माऊसचे विविध प्रकार
थ्रीडी, टॅक्टिकल, अर्गोनॉमिक, गेमिंग, वायरलेस

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mouse orphaned inventor of the computer mouse douglas engelbart dies