संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर गुरुवारी विरोधी पक्षांनी विजय चौकापर्यंत संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या दरम्यान राहुल गांधींनी सरकारवर गंभीर आरोप केले आणि सभागृहात खासदारांसोबत गैरवर्तन केल्याबद्दल भाष्य केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदा खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांना मारहाण करण्यात आली.
विजय चौक येथे आल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.”आम्ही पेगॅससचा मुद्दा, महागाई, शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला, पण संसदेत बोलण्याची परवानगी नव्हती. आज आम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी इथे यावं लागले कारण आम्हाला संसदेत बोलण्याची परवानगी नाही. ही लोकशाहीची हत्या आहे,” असे राहुल गांधीनी यावेळी म्हटलं.
“संसदेत खासदारांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासदारांना मारहाण करण्यासाठी बाहेरचे लोक आणले गेले. तरीही, ते अध्यक्षांच्या अश्रूंबद्दल बोलतात. सभागृह चालवणे हे अध्यक्षांचे काम आहे, ”असे राहुल गांधी म्हणाले.
संपूर्ण पावसाळी अधिवेशनात संसदेत केंद्रावर कारभारावर हल्ला चढवणारे राहुल गांधी म्हणाले, “काल देशातील ६० टक्के लोकांचा आवाज दाबला गेला. त्यांना अपमानित करण्यात आलं आणि त्यांच्यावर हल्ला केला गेला.”
हे ही वाचा >> “ही लोकशाही आहे का?”; विधेयक मंजूर करताना मार्शल बोलवल्याने संजय राऊत संतापले
यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत विरोधी पक्षांच्या मोर्चात सहभागी झाले होते. “बाहेरून लोकांना संसदेत आणण्यात आले ज्यांनी मार्शल कपडे घातले आणि महिला खासदारांवर हल्ला केला. ही लोकशाहीची दररोज हत्या आहे,” असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं. असे वाटले की मी संसदेत नाही तर पाकिस्तानच्या सीमेवर उभा आहे, असे राऊत पुढे म्हणाले.
“५५ वर्षांच्या करिअरमध्ये मी असं कधी पाहिलेलं नाही”; राज्यसभेतील गोंधळावरुन शरद पवार संतापले https://t.co/VFUSNCQgQm < येथे वाचा सविस्तर वृत्त #MonsoonSession2021 #ParliamentMonsoonSession #RajyaSabha #SharadPawar @PawarSpeaks @NCPspeaks pic.twitter.com/OepnNtlKjg
— LoksattaLive (@LoksattaLive) August 12, 2021
गुरुवारी विजय चौक येथे विरोधी पक्षाच्या आंदोलनाला समाजवादी पक्षाचे नेतेही उपस्थित होते. बुधवारी विधेयकाला मंजुरी देण्याच्या दरम्यान, राज्यसभेत विरोधी पक्षाचे खासदार आणि मार्शल यांच्यात हाणामारी झाली. काँग्रेसच्या राज्यसभेच्या काही महिला खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये विरोध करत असताना त्यांना मार्शलनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.