देशात ५ राज्यांमध्ये आता हळूहळू निवडणुका आणि त्याअनुषंगाने होणारा तुफान प्रचार याचा ज्वर चढू लागला आहे. यात ममता बॅनर्जी आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यातलं ‘सख्य’ विख्यात असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून पश्चिम बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली आहे. मात्र, त्यापाठोपाठ आता शेजारच्या आसाममध्ये देखील प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. प्रमुख पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा आसामच्या निसर्गम्य वातावरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच गर्मी वाढवू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी आसाममधल्या त्यांच्या प्रचारसभेमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या काँग्रेसच्या दोन स्टार कॅम्पेनर्सवर खोचक शब्दामध्ये टीका केली आहे.
सीजन नसताना चहापत्तीची तोडणी!
गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी अनेक ठिकाणी थेट जनतेशी संवाद प्रस्थापित होण्यासाठी लोकांमध्ये जात असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचा पुद्दुचेरीमधील कोळी बांधवांसोबत पाण्यात डुबकी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर दुसरीकडे प्रियांका गांधी यांचा आसाममधल्या चहाच्या मळ्यांमध्ये तिथल्या महिला मजुरांसोबत चहाची पाने खुडतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे.
Video: प्रियंका गांधींची ‘चाय की बात’; थेट मळ्यात जाऊन केली चहाच्या पानांची तोडणी
“एकीकडे राहुलजी आहेत ते थेट समुद्रात सूर मारत आहेत, तर दुसरीकडे प्रियांकाजी आहेत, ज्या हंगाम नसताना चहाच्या मळ्यांमध्ये चहापत्ती खुडताना दिसत आहेत. तुम्ही चहाची पानं खुडत होतात, की चित्रपटाचं शूटिंग करत होतात?” असा खोचक टोला चौहान यांनी लगावला आहे. आसामच्या नहरकाटिया भागामध्ये प्रचारसभेत ते बोलत होते.
“राहुल गांधी जिनांच्या मार्गावर”
“राहुल गांधी महात्मा गांधीजींच्या मार्गावरून चालत नसून मोहम्मद अली जिनांच्या मार्गावरून चालत आहेत. आणि तो मार्ग आसामच्या आणि भारताच्याही जनतेला मान्य होणार नाही. काँग्रेसने तर आसाम उद्ध्वस्त करण्यामध्ये काहीही कसर न सोडणाऱ्या बद्रुद्दीन अजमलसोबत हातमिळवणी केली”, असं देखील चौहान म्हणाले.