डॉक्टरांकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधाच्या चिठ्ठीवर हिंदीमध्ये मजकूर लिहावा असा सल्ला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिला आहे. भोपाळमधील एका कार्यक्रमामध्ये जाहीर भाषणात चौहान यांनी हा सल्ला दिला आहे. मात्र हा सल्ला देताना त्यांनी डॉक्टरांना औषधांच्या चिठ्ठीवर म्हणजेच प्रिस्क्रीप्शनवर एरएक्स ऐवजी श्री हरी लिहावं असंही म्हटलं आहे.
राजधानी भोपाळमधील हिंदी विमर्श या भारत भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री चौहान बोलत होते. गावागावांमध्ये डॉक्टरांची गरज आहे. हे डॉक्टर हिंदीमध्ये प्रीस्क्रीप्शन लिहितील असं चौहान यांनी म्हटलं आहे. जर क्रोसीन असं औषधाचं नाव लिहायचं असलं तर ते हिंदीत नाही लिहू शकत का? हिंदीत लिहिण्यात काय अडचण आहे? असा प्रश्न चौहान यांनी विचारला. तसेच, ‘वर श्रीहरी लिहा आणि खाली लिहून टाका क्रोसीन’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
आपल्या या भूमिकेचं समर्थन करताना चौहान यांनी, “आपण इंग्रजीविरोधी नसून राष्ट्रभाषेबाबत जागृकता निर्माण करण्याच्या दृष्टीने सल्ला देत असल्याचा युक्तीवाद केला. सामान्यपणे डॉक्टरांकडून औषधांची नावं लिहून देताना प्रिस्क्रीप्शनवर आरएक्स अशी इंग्रजी अक्षरं लिहिली जातात. त्याऐवजी चिठ्ठीच्या वर श्रीहरी लिहावं असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
काही विकूनही मुलांना शिकवायचं झालं तरी त्यांना इंग्रजी मिडियमच्या शाळेत टाकावं असं गावातील गरीब व्यक्तींनाही वाटतं. मी एका मुलाला मेडिकल कॉलेजमधील शिक्षण अर्धवट सोडताना पाहिलं आहे. त्याने शिक्षण मध्येच सोडून देण्यामागील कारण होतं त्याला इंग्रजी येत नव्हती. त्यामुळेच मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांमध्ये हिंदीसंदर्भात असणारी मतं बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं मुख्यमंत्री चौहान म्हणाले.