मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंदिरांच्या जमिनीच्या लिलावाबाबत मोठी घोषणा केली. यानुसार मंदिराच्या सर्व जमिनींचे लिलाव करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाही, तर पुजाऱ्यांना देणार असल्याचं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. तसेच ब्राह्मणांनी नेहमी धर्माचं रक्षण केल्याचा दावा करत शिवराज चौहान यांनी त्यांच्यासाठी एका योजनेची घोषणा केली. ते शनिवारी (२२ एप्रिल) एका सभेत बोलत होते.
शिवराज सिंह चौहान म्हणाले, “सरकार कोणत्याही मंदिराच्या व्यवहारांवर नियंत्रण आणणार नाही. त्यामुळे जेवढी जमीन मंदिरांच्या नावावर आहे तेवढ्या जमिनीचा लिलाव जिल्हाधिकारी करू शकणार नाहीत. त्या जमिनीचा लिलाव केवळ पुजाऱ्यांनाच करता येईल. याशिवाय जे खासगी मंदिरं आहेत आणि जिथं विश्वस्त मंडळ तयार करण्यात आलं आहे तेथेही पुजाऱ्यांना सन्मानजनक मानधन देण्याचे नियम तयार करून निर्देश दिले जातील.”
“ब्राह्मणांनी नेहमी धर्माचं रक्षण केलं आहे”
“ब्राह्मणांनी नेहमी धर्माचं रक्षण केलं आहे. संस्कृतीचं रक्षण केलं आहे. मला हे सांगताना गर्व वाटतो की, ब्राह्मणांनी धर्म, अधात्म, ज्ञान-विज्ञान, योग-आयुर्वेद, परंपरा आणि संस्कृतीचं रक्षण काम करण्याचं काम केलं. त्यांनी यज्ञ, हवन, शास्त्र सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम केलं. त्यांनी संस्कृतीचं रक्षण करण्याचं काम केलं,” असं मत शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला? दिग्विजय सिंह यांच्या विधानानंतर चर्चेला उधाण!
“धर्म-संस्कृतीचे रक्षक करणाऱ्या ब्राह्मणांच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करणार”
“असे अनेक विद्वान आहेत. वेदव्यास महाराजांनी महाभारत लिहिलं, तुलसीदास यांनी रामायण लिहिलं. प्रत्येक क्षेत्रात असे विद्वान आहेत. त्यामुळे आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षक ब्राह्मण आहेत. त्यांच्या कल्याणासाठी ब्राह्मण कल्याण मंडळाची स्थापना केली जाईल,” अशी घोषण शिवराज सिंह चौहान यांनी केली.