भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विरोधी आघाडी ‘इंडिया’तील घटक पक्षांनी परस्परांविरुद्ध विरोधात उमेदवार उभे केल्याचा खरपूस समाचार घेतला. या पक्षांनी ‘दिल्लीत दौस्ती आणि राज्यात कुस्ती’ करण्याच्या धोरणाचे पालन करायचे ठरवल्याचे चौहान यांनी सांगितले.
हेही वाचा >>> भाजपचे नेते काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक – राहुल गांधी यांचा दावा
काँग्रेस, समाजवादी पक्ष (एसपी) आणि आम आदमी पार्टी (आप) या ‘इंडिया’ या विरोधी आघाडीतील घटक पक्षांनी मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काही जागांसाठी आपापले वेगळे उमेदवार जाहीर केले आहेत.
मध्य प्रदेशात काँग्रेसने समाजवादी पक्षाला एकही जागा न सोडल्याने संतप्त झालेले समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातही काँग्रेसला आपल्या पक्षाकडून अशीच वागणूक मिळू शकते, असे संकेत गुरुवारी दिले. या पार्श्वभूमीवर चौहान म्हणाले, की आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत आहोत की ही ‘न जुळलेली युती’ आहे. त्यांची दिल्लीत दोस्ती आणि राज्यांत कुस्ती सुरू आहे.