लोकसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. १ जून रोजी सातव्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील, असा विश्वास भाजपाकडून व्यक्त केला जातो आहे. तर देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल, असं विरोधकांचे म्हणणं आहे. अशातच मध्यप्रदेश काँग्रेसने निकालापूर्वीची जल्लोषाची तयारी पूर्ण केली आहे. त्यासाठी १ क्विंटल लाडूची ऑर्डरही देण्यात आल्याची माहिती आहे.
मध्यप्रदेशामध्ये लोकसभेच्या एकूण २९ जागा आहेत, त्यापैकी २७ जागांवर काँग्रेसने निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला १० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जातो आहे. याशिवाय मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनीही काँग्रेसला दुहेरी संख्येत विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा – काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी ‘काळी जादू’; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा आरोप
विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला होता. त्यापूर्वी २०१४ मध्ये काँग्रेसला केवळ २ जागा मिळाला होत्या. २०२३ च्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. असे असतानाही आता काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जल्लोषाची तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसने निकालाच्या दिवसासाठी १ क्विंटल लाडूची ऑर्डर दिली आहे. तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भोपाळला पोहोचण्यासाठी रेल्वेचे तिकीटही बूक केले आहे.
यासंदर्भात बोलताना मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हाफीज म्हणाले, मागील १० वर्षात भाजपाने लोकांच्या हिताची कामं केली असती, तर त्यांनी विजयाचा जल्लोष करण्याची आणखी एक संधी मिळाली असती, मात्र, आता ते शक्य नाही. मध्यप्रदेशमध्ये भाजपाचा पराभव निश्चित आहे. भाजपाने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी भोपाळमध्ये पोहोचण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी रेल्वेच्या तिकीटही बूक केल्या आहेत. तसेच १ क्विंटल लाडूची ऑर्डरही देण्यात आली आहे. हा जल्लोष केवळ मध्यप्रदेशपुरता मर्यादित नसून देशभर होणार आहे. कारण देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे.
हेही वाचा – मदत निधीच्या आरोपावरून भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली; पंतप्रधान मोदींच्या दाव्यात किती सत्य?
दरम्यान, यावरून भाजपानेही काँग्रेसला टोला लगावला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४ जून रोजी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील आणि मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येईल. काँग्रेसला त्याचा आनंद साजरा करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे. मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपा सरकार ऐतिहासिक आणि प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे, अशी प्रतिक्रिया मधप्रदेश भाजपाच्या मीडिया सेलचे प्रमुख आशिष अग्रवाल यांनी दिली.
© IE Online Media Services (P) Ltd