आपण अनेकदा जमीन-जुमला आणि संपत्तीची वाटणी होताना पाहिलं आहे. परंतु कोणी नवऱ्याची वाटणी पाहिली किंवा ऐकली आहे. नसेल ऐकली तर तुम्हाला आता अशा प्रकरणाची माहिती मिळणार आहे. नवऱ्याच्या वाटणीचं एक प्रकरण नुकतंच पाहायला मिळालं आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेर जिल्ह्यातलं आहे. येथील एका व्यक्तीच्या दोन पत्नी आहेत. या दोन्ही बायका थेट न्यायालयात पोहोचल्या होत्या. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणी सुनावणी केली आणि एक अजब निर्णय दिला आहे.
दोन बायकांनी कोर्टाकडे दाद मागितल्यानंतर या प्रकरणावर सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्यायाधीशांनी या प्रकरणावर तोडगा काढला आहे. न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर आता हा पती आठवड्यातले तीन दिवस पहिल्या पत्नीसोबत आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहाणार आहे. तर रविवारी काय करायचं हे ठरवण्याचा अधिका पतीला देण्यात आला आहे.
हा तरुण हरियाणामधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत अभियांत्रिक आहे. त्याचं पहिलं लग्न २०१८ मध्ये झालं होतं. लग्नानंतर पती-पत्नी एकत्र राहात होते. परंतु २०२० मध्ये कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागला. त्यावेळी पती-पत्नी त्यांच्या घरी ग्वाल्हेरला परतले. लॉकडाऊन हटवल्यानंतर पती हरियाणाला गेला तर पत्नी ग्वाल्हेरलाच राहिली. त्यानंतर या तरुणाची त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका महिलेशी जवळीक वाढली. काही दिवसांनी युवकाने या महिलेशी लग्न केलं.
दरम्यान, नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची माहिती पहिल्या पत्नीला मिळाल्यानंतर तिने मोठा गोंधळ घातला. त्यानंतर तिने थेट ग्वाल्हेर कुटुंब न्यायालयात धाव घेतली. सुनानवणीच्या वेळी न्यायालयाने नवरा आणि त्याच्या दोन्ही पत्नींमध्ये मध्यस्थी करून हे प्रकरण निकाली काढलं.
हे ही वाचा >> “श्रीकृष्ण स्वप्नात आले आणि…”, LLB चं शिक्षण घेत असलेल्या तरुणीने केलं कान्हाच्या मूर्तीशी लग्न
दोन्ही बायकांना एक-एक फ्लॅट द्यावा लागणार
कोर्टाच्या मध्यस्थीनंतर नवरा त्याच्या दोन्ही बायकांना प्रत्येकी एक-एक फ्लॅट देईल. या फ्टॅटमध्ये दोन्ही बायका राहातील. तसेच त्याच्या ७५ हजार रुपये इतक्या पगारातील अर्धे-अर्धे पैसे तो त्याच्या दोन्ही बायकांना देईल. तीन दिवस पहिल्या पत्नीसोबत आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहील. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी काय करायचं हे तो स्वतः ठरवेल. कोर्टाचा हा तोडगा तिघांनी मान्य केला आहे.