मध्य प्रदेश सरकारने गुरुवारी एका आयएएस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. याचं कारण म्हणजे या अधिकाऱ्याचं एक ट्वीट. या ट्वीटमध्ये त्याने सध्या चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाईल्स’बद्दल भाष्य केलं आहे. प्रशासकीय सेवेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा या अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आला आहे. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी खान यांनी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
नियाझ खान हे प्रशासकीय अधिकारी आहेत. ते राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात उपसचिव पदावर कार्यरत आहेत. काश्मीर फाईल्सच्या निर्मात्यांनी देशातल्या अनेक राज्यांमधल्या मुस्लिमांच्या कत्तलीविषयीही चित्रपट बनवावा, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी गेल्या आठवड्यात केलं होतं. आपल्या ट्वीटमध्ये नियाझ खान म्हणतात, कश्मीर फाईल्समध्ये ब्राह्मणांचं दुःख दाखवलं आहे. त्यांना मानाने आणि सुरक्षितपणे काश्मीरमध्ये राहण्याची परवानगी मिळायला हवी. निर्मात्यांनी देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये होणाऱ्या मुस्लिमांच्या कत्तलीविषयीही चित्रपट बनवायला हवा. मुस्लीम किडे-मुंग्या नाहीत, तीही माणसेच आहेत आणि या देशाचे नागरिक आहेत.
आपण मुस्लिमांच्या कत्तलींवर पुस्तक लिहिण्याच्या विचारात आहोत, जेणेकरून जसं द कश्मीर फाईल्स हा चित्रपट तयार झाला, तसंच कोणीतरी या विषयीही चित्रपट तयार करेल, असंही खान यांनी पुढे म्हटलं आहे. त्याचबरोबर खान यांनी निर्मात्यांना चित्रपटाच्या कमाईची रक्कम काश्मिरी पंडितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तसंच त्यांच्यासाठी काश्मीरमध्ये घरं बांधून देण्यासाठी खर्च करावी, अशी विनंतीही केली आहे.
त्यांचं हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खान यांच्यासोबत विचारविमर्श करण्यासाठी त्यांची भेट घेण्याचं ठरवलं आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितलं की खान यांचे ट्वीट्स हा एक गंभीर मुद्दा आहे, त्यामुळेच राज्य सरकारने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.