दिल्लीतील एका घटनेने संपूर्ण देश खळबळ उडाली आहे. एक तरुणाने आपल्या प्रेयसीचा चाकूने सपासप वार करून निर्दयी पद्धतीने खून केला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आरोपी साहिलला अटक करण्यात आली असून, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार नवनीत राणा यांनीही आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
नेमकं घडलं काय?
दिल्लीतील जेजे कॉलनी येथे राहणाऱ्या १६ वर्षीय तरुणीचं आणि साहिलशी प्रेमसंबंध होते. रविवारी ( २८ मे ) रात्री अल्पवयीन तरुणी आपल्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जात होती. तेव्हाच साहिलला तिने अडवलं. यावेळी दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. हाच राग मनात धरून साहिलने तरुणीवर चाकूने सपासप २१ वार केले. त्यानंतर दगडाने तरुणीचं डोक ठेचलं आहे.
हेही वाचा : दिल्लीतील ‘त्या’ तरुणीच्या मानेवर अन् पोटावर २१ नव्हे तर…; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर
याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी ३०२ नुसार साहिलविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी साहिलला बुलंदशहरमधून अटक केली आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाष्य केलं आहे.
नवनीत राणा म्हणाल्या की, “दिल्लीतील तरुणीवर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. घटनेचे सीसीटीव्ही व्हिडीओ उपलब्ध असल्याने न्यायव्यवस्थेने याची दखल घ्यावी. अन्यथा आपल्या देशामध्ये न्याय कित्येक वर्षे उलटूनही मिळत नाही. देशातच आजही मुली सुरक्षित नाहीत, न्यायासाठी भीक मागावी लागते,” असेही नवनीत राणांनी म्हटलं.
१० दिवसांपासून तरुणी मैत्रिणीच्या घरी…
तरुणीच्या आईने म्हटलं की, “मुलगी गेल्या १० दिवसांपासून मैत्रिणीच्या घरीच राहत होती. आम्ही मुलीला अनेकवेळा साहिलबाबत विचारलं होतं. साहिलला फाशीची शिक्षा दिली पाहिजे,” अशी मागणी तरुणीच्या आईने केली.