MP Salary Hike : केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांचे वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांच्या पगाराबरोबरच भत्ते आणि माजी खासदारांचे पेन्शन देखील वाढवण्यात आले आहे. ही वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. संसदीय कार्य मंत्रालयाने सोमवारी यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचे वेतन एक लाख रूपयांनी वाढून १.२४ लाख रुपये प्रति महिना झाले आहे. तर दैनिक भत्ता हा २,००० रूपयांनी वाढून २,५०० रुपये झाला आहे.
पगारासह माजी खासदारांचे पेंशन देखील २५,००० रुपये वाढवून ३१,००० प्रति महिना करण्यात आले आहे. याशिवाय पाच वर्षांपेक्षा जास्त सेवेसाठी अतिरिक्त पेन्शन २,००० हून वाढून २,५०० रुपये झाली आहे. हा निर्णय संसदेच्या बजेट सेशनदरम्यान घेण्यात आला आहे. यापूर्वी पगार आणि भत्त्यांमध्ये झालेली वाढ ही एप्रिल २०१८ साली करण्यात आली होती.
२०१८ मध्ये खासदारांचे मूळ वेतन १ लाख रुपये महिना निश्चित करण्यात आले होते. याचा उद्देश त्यांचा पगार महागाई आणि उदरनिर्वाह यासाठी लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ याच्या प्रमाणात असेल. २०१८ मध्ये केलेल्या बदलानुसार खासदारांना त्यांच्या भागात कार्यलय चालवण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी ७० हजार रुपयांचा भत्ता दिला जातो. याशिवाय त्यांना कार्यालयीन खर्चासाठी ६० हजार रुपये महिना आणि संसदेच्या अधिवेशनादरम्यान प्रत्येक दिवसी २ हजार रुपयांचा भत्ता दिला जातो. आता या भत्त्यांमध्येही वाढ करण्यात येईल.
खासदारांना कोणत्या सुविधा मिळतात?
याशिवाय खासदारांना दरवर्षी फोन आणि इंटरनेटचा वापर करण्यासाठी देखील भत्ता दिला जातो, ते स्वतः किंवा त्यांचे कुटुंबिय वर्षात ३४ वेळा मोफत डोमेस्टिक फ्लाइट मधून प्रवास करू शकतात. ते कार्यालयीन कामासाठी किंवा खाजगी कामासाठी कधीही फर्स्ट क्लासने रेल्वे प्रवास करू शकतात. रस्त्याने प्रवास केल्यानंतर त्यांना इंधनाचा खर्च दिला जातो. खासदारांना दरवर्षी ५० हजार यूनिट वीज आणि ४ हजार किलोलीटर पाणी मोफत दिले जाते.
सरकार त्यांच्या राहण्याची देखील सोय करते. खासदारांना दिल्लीत कोणतेही भाडे न देता मोफत घर मिळते. त्यांना त्यांच्या ज्येष्ठतेवरून हॉस्टेलचे रुम, अपार्टमेंट किंवा बंगला दिला जाऊ शकतो. जे खासदार सरकारी निवासस्थान घेत नाहीत त्यांना दर महिन्याला घराचा भत्ता दिला जातो.