लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता एनडीएने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. पुढच्या एक ते दोन दिवसांत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. मात्र, यावरूनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे “नरेंद्र मोदी यांना एनडीएचं सरकार चालवताना नाकीनऊ येतील, आम्ही भारतीय जनता पक्षाला बहुमतापासून रोखलं आहे. आज नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू तुमच्याबरोबर असले तरी उद्या आमच्याबरोबर येतील”, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.
संजय राऊत काय म्हणाले?
इक्बाल मिर्ची प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं, “हाच नियम दुसऱ्या लोकांनाही लावायला पाहिजे. मग फक्त प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतच हा नियम का? ईडी सर्वांसाठी आहे तर असा नियम इतरांनाही लावा. फक्त प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी हा वेगळा न्याय का? आमच्यावर कारवाई झाली तेव्हा आमची काही प्रॉपर्टी नसताना आम्ही राहत असलेलं घर आणि गावात असलेल्या थोड्याशा जमिनीवर जप्तीची कारवाई केली. असेच प्रकरण प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांचेही आहे. त्यांच्यावर काही कारवाई नाही. पण आमच्यावर कितीही कारवाई करा, आम्ही कोणालाही भित नाहीत, आम्ही आमच्या पक्षासोबत आणि महाराष्ट्राबरोबर कधीही धोका करत नाहीत”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा : कोकण मतदारसंघातून मनसेची माघार; ‘अभिजीत पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत’, नितीन सरदेसाईंची माहिती
अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कानशिलात लावल्याची घटना समोर आली होती. या घटनेवर आता संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “काही लोक मत देतात आणि काही लोक थप्पड देतात. याबाबत मला जास्त माहिती नाही. मात्र, जर सुरक्षारक्षक महिलेने सांगितलं की त्यांची आई शेतकऱ्यांच्या आंदोलनात होती. पण काहीजण त्यांच्याबाबत चुकीचं विधान करत असतील तर हे चुकीचं आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक महिलेला संताप आला असेल. महिला सुरक्षारक्षकाने त्यांच्या आईसाठी कायदा हातात घेतला. मात्र, कंगना रणौत या सध्या खासदार आहेत. त्यामुळे एका खासदारावर अशा प्रकारे हात उचलणं योग्य नाही”, असं राऊत म्हणाले.
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू तुमच्याबरोबर, पण…
संजय राऊत पुढे म्हणाले, “नरेंद्र मोदी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र, एनडीएचं सरकार चालवताना नरेंद्र मोदी यांचे नाकीनऊ येतील. मुळात एनडीएमध्ये आहेच कोण? नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू. आता हे दोघेही सर्वांचे आहेत. म्हणजे आज ते तुमच्याबरोबर आहेत. उद्या आमच्याबरोबर असतील. आताच नितीश कुमार यांच्या पक्षाने मोदी सरकारच्या अग्निवीर भरतीला विरोध केला आहे. मोदींनी जे मुद्दे प्रचारात आणले होते, त्याला हे लोक विरोध करत आहेत. हे उद्या राम मंदिरालाही विरोध करतील. चंद्राबाबू नायडू हे म्हणत होते की, आम्ही सत्तेत आल्यानंतर मुस्लिमांना आरक्षण देणार, असे अनेक मुद्दे आहेत. त्यावर चर्चा होण्याची बाकी आहे. पण खरं तर सरकार बनवण्याचा अधिकार हा इंडिया आघाडीचा आहे. कारण आम्ही सर्वांनी मिळून भाजपाला बहुमतापासून दूर ठेवलं आहे”, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना इशारा दिला.