मध्य प्रदेश पोलिसांनी आज एका १९ वर्षीय तरुणाला भोपाळमधून अटक केली आहे. राज्यातील सागर जिल्ह्यामध्ये या तरुणाने चार सुरक्षा रक्षकांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मात्र पोलिसांनी या आरोपीला अटक करण्याआधी त्याने भोपाळमधील खाजुरी येथे अन्य एका सुरक्षा रक्षकाची हत्या केली होती. या तरुणाला मोबाईल फोनमधील सीम कार्ड ट्रॅक करुन पोलिसांनी त्याला रात्री साडेतीन वाजता अटक केल्याची माहिती सुत्रांनी दिल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे.

पोलिसांनी या आरोपीला अटक केल्यानंतर त्याने एकूण सहा जणांची हत्या केल्याचं सांगितलं. आपल्याला फेमस व्हायचं होतं म्हणून आपण एकूण सहा सुरक्षा रक्षकांची हत्या केली. आता केलेल्या पाच हत्यांबरोबरच काही वर्षांपूर्वी पुण्यात आपण एका सुरक्षा रक्षकाचा जीव घेतला होता असंही या आरोपीने सांगितलं आहे. मोबाईल ट्रॅकिंगच्या मदतीने या आरोपीला पकडण्यात आलं असून पोलीस महासंचालक सुधीर सक्सेना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या हल्लेखोराने प्राण घेतलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी सागर जिल्ह्यामध्ये हल्ला झालेल्या चौथ्या सुरक्षा रक्षकाचं नावं मंगल अहिरवार असं होतं. भोपाळमधील हमिदीया रुग्णालयामध्ये उपचादार सुरु असतानाच या व्यक्तीचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री या हल्लेखोराने मंगलवर हल्ला केला होता. बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कवटीला गंभीर दुखापत झाल्याने मंगलचा मृत्यू झाला.

मंगलने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे हल्लेखोराचं चित्र तयार करुन ते जारी करम्यात आलेलं. सागरचे पोलीस निरिक्षक तरुण नायक यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना या आरोपीची माहिती देणाऱ्याला ३० हजारांचं बक्षीस दिलं जाईल असं जाहीर केलं होतं. हा हल्लेखोर झोपलेल्या सुरक्षा रक्षकांवर हल्ला कारायचा. त्यामुळेच त्याला पकडण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली.

या हल्लेखोराने हल्ला केलेल्या सुरक्षा रक्षकांची नावं उत्तम रजक, कल्याण लोढी आणि शंभुराम दुबे अशी असून हे सर्वजण ५० ते ६० वयोगटातील आहेत. लोढी आणि दुबे यांची हत्या कॅनटॉमेंट आणि सिव्हील लाइन पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाली. रविवारी आणि सोमवारी रात्री एकामागोमाग एक दोन सुरक्षा रक्षकांच्या हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली.

मे महिन्यात या हल्लेखोराने सर्वात आधी उत्तम रजक यांची हत्या केली होती. एका पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या ५८ वर्षीय उत्तम यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर बूट ठेऊन हल्लेखोर पळून गेला होता.

या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला कारण तोपर्यंत इतर ठिकाणी असं काही घडल्याची माहिती समोर आली नव्हती. त्यानंतर आता मंगळवारी स्थानिकांना ६० वर्षीय दुबे नावाचा सागरमधील आर्ट्स आणि कॉमर्स महाविद्यालयाचा सुरक्षा रक्षक कॅनटीनजवळ मृतावस्थेत आढळून आला. झोपेत असतानाच दुबेवर हल्ला करण्यात आला. दुबेच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक फोन सापडला. या फोनमध्ये सीम कार्ड नव्हतं. मात्र इतर माहितीवरुन हा फोन ५७ वर्षीय लोढी यांचा असल्याचं समजलं. त्यानंतर लोढी यांचा शोध घेतला असता त्यांच्यावर आधीच्या रात्री हल्ला करण्यात आल्याचं उघड झालं. यावरुन पोलिसांनी मोबाईल मरण पावलेल्या मंगल आहिरवार यांच्या फोनचं लोकेशन शोधून पाचवी हत्या करणाऱ्या या आरोपीला अटक केली. मात्र पोलिसांना हे लोकेश कळेपर्यंत हल्लेखोराने आणखीन एका सुरक्षा रक्षकाचा जीव घेतला होता.