छत्तीसगडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी औषधं आणायला जात असलेल्या व्यक्तीच्या कानशिलात लगावल्याच्या प्रकरणाला दोन दिवस झाले आहेत. त्यानंतर आता मध्य प्रदेशमधील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील शहाजापूरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी एका दुकानदाराच्या कानशिलात लगावल्याचं व्हिडिओत दिसत आहे. मंजुषा विक्रांत राय असं अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं नाव आहे. लॉकडाउन कालावधीत चप्पल विक्रेत्याने दुकान उघड ठेवल्याने त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी त्याच्या कानशिलात लगावली.

या व्हायरल व्हिडिओत अतिरिक्त जिल्हाधिकारी त्या दुकानदाराला खडसावताना दिसत आहेत. “तुझं घर कुठे आहे?”. जेव्हा दुकानदाराने घराचा पत्ता सांगितला तेव्हा खोटं बोलत असल्याचं सांगत त्यांनी त्याच्या कानशिलात लगावली. तात्काळ पोलीस पुढे आले आणि त्याने त्याला दांड्याचा धाक दाखवला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दुकानदाराला दुकान बंद करण्याची ताकीद देऊन तेथून निघून गेले.

“माझं दुकान बंद होतं. तरी पोलिसांनी ते उघडलं. अधिकाऱ्यांनी माझ्या कानशिलात लगावली आणि पोलिसांनी दांड्याचा धाक दाखवला”, असं दुकानदाराने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता यल्लो फंगसचा धोका; उत्तर प्रदेशात आढळला पहिला रुग्ण

या व्हायरल व्हिडिओची दखल मध्य प्रदेश सरकारने घेतली आहे. मंत्री इंदर सिंह पारमार यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं वागणं चुकीचं असल्याचं कबुल केलं आहे. गरज पडल्यास आम्ही अधिकाऱ्यावर कारवाई करू असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील सर्वच राज्यांनी लॉकडाउन आणि कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे दुकानदार, नोकरदार यांना वेळेची मर्यादा पाळावी लागत आहे. अनेक राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातही ३१ मे पर्यंत लॉकडाउन आहे. त्यामुळे निर्बंध असल्याने दुकानांना मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

Story img Loader