अप्रत्यक्षपणे पक्षविरोधी वक्तव्य करण्याची आगळीक भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या अंगाशी आल्याचे दिसत आहे. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शत्रुघ्न सिन्हा यांची कानउघाडणी केल्याचे समजते.
भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार या नात्याने नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे जवळपास निश्चित झाले असताना शत्रुघ्न मात्र मोदी यांच्याविरोधात सातत्याने वक्तव्ये करत आहेत. गेल्या पंधरवडाभरात त्यांनी तीन वेळा अशी जाहीर विधाने केली आहेत. मोदी हे लोकप्रिय असतील, मात्र लोकप्रियतेचा निकष लावायचा ठरविल्यास अमिताभ बच्चन हेही देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, असे विधान शत्रुघ्न यांनी नुकत्याच एका उपग्रह वाहिनीवर केले होते. यापुढेही जाऊन पंतप्रधानपदासाठी मोदींपेक्षा लालकृष्ण अडवाणी हेच अधिक योग्य उमेदवार आहेत, असे सांगताना त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचेही कौतुक केले होते. ही विधाने गांभीर्याने घेत राजनाथ यांनी शत्रुघ्न यांना समज दिल्याचे समजते. मोदींच्या विरोधात टीका करू नका, तसेच रालोआमधून बाहेर पडलेल्या जनता दल युनायटेडच्या नितीशकुमार यांचे कौतुक करण्याचीही आवश्यकता नाही, अशा शब्दांत त्यांनी शत्रुघ्न यांना फटकारले. या कानउघाडणीमुळे स्वपक्षाविरुद्धची शत्रुघ्न यांची शेरेबाजी थांबण्याची शक्यता आहे.
अमिताभ लोकप्रिय असूनही..
अमिताभ बच्चन हे देशभरात नि:संशयपणे लोकप्रिय आहेत, मात्र चित्रपटांमधील काल्पनिक विश्व आणि खरे आयुष्य यात खूप तफावत आहे. आजच्या घडीला सार्वजनिक जीवनात नरेंद्र मोदी हेच सर्वाधिक लोकप्रिय आहेत, हे कोणी नाकारू शकत नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ता शहानवाझ हुसेन यांनी शत्रुघ्न यांना टोला मारला.

Story img Loader