काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवली किंवा आघाडी म्हणून लढवली, तरी काँग्रेसला शेवटी विरोधातच बसायचं आहे, असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी आज १८व्या लोकसभेतील पहिलं भाषण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी भाषणाची सुरुवात पांडुरंगाच्या जयघोषणाने केली. तसेच त्यांनी तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल कल्याणमधील जनतेचे आभारही मानले.
हेही वाचा – “केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं”, लोकसभेतील पहिल्याच भाषणात अमोल कोल्हेंच…
नेमकं काय म्हणाले श्रीकांत शिंदे ?
“मी देशातील आणि राज्यातील जनतेचे आभार मानतो, त्यांनी पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवले. तसेच मी कल्याणमधील जनतेचेही आभार मानतो, की त्यांनी मला तिसऱ्यांदा मला लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून दिले. मी एनडीए सरकारला तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. मागच्या १० वर्षात एनडीए सरकारने जी विकासाची कामं केली आहेत, ती पुढचे पाच वर्ष सुरु राहतील, असा मला विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.
श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकाही केली. “काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवली किंवा आघाडी म्हणून लढवली, तरी काँग्रेसला शेवटी विरोधातच बसायचं आहे. आज काँग्रेस विरोधी पक्षात आहे, मात्र, त्यांना सत्तेत असल्याचा सारखा आनंद होतो आहे. गेल्या १० वर्षांत काँग्रेस ४४ जागांवरून केवळ ९९ जागांवर पोहोचली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला १०० च्या संख्येपर्यंतही पोहचता आलेलं नाही”, असे ते म्हणाले.
“काँग्रेसने २८५ जागांवर निवडणूक लढवली. मात्र, केवळ ९९ जागांवर त्यांना विजय मिळवता आला. या निवडणुकीत काँग्रेसच्या ५१ उमेदवारांची जमानत जप्त झाली. आंध्राप्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश या राज्यांत काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसने आता आत्मचिंतन करण्याची आवश्यता आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.
“देशातील जनतेने तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवले आहे. २०२४-२५ मध्ये ८० देशांमध्ये निवडणुका आहेत. त्यापैकी ५० देशांतील निवडणुका झाल्या आहेत. त्यातही ३४ देशांमध्ये सरकार बदलले आहे. मात्र, भारतातील जननतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला आहे. कारण पंतप्रधान मोदी यांनी आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उंचावलं आहे. भारत आज आत्मनिर्भरतकडे वाटचाल करतो आहे ”, असेही ते म्हणाले. तसेच “काँग्रेसच्या धोरणांमुळे देशातील अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली होती. २६/११ च्या हल्ल्याचे उत्तर काँग्रेस देऊ शकत नव्हती. मात्र, मोदी सरकारने पाकिस्तानला जशात तसं उत्तर दिलं आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.