मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एका मुस्लीम समाजातील व्यक्तीला ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यास भाग पाडल्याप्रकरणी उज्जैन पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघेही जण एका मुस्लीम समाजातील व्यक्तीला हाताला पकडून ठेवून ‘जय श्री राम’चा नारा देण्यास बळजबरी करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्या दोघांविरोधात अनेक अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत.

प्रचंड व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये सुरुवातील ती मुस्लिम व्यक्ती ‘जय श्री राम’चा नारा देण्यास तयार नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे पुढे त्यासाठी बळजबरी करणारे ते दोघेही जण त्या व्यक्तीला “तुला ‘जय श्री राम’चा म्हणण्यास नेमकी अडचण काय आहे?” असा प्रश्न करत विचारताना दिसत आहेत. अखेर या दोघांनी खूप जास्त सक्ती केल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या इच्छेविरुद्ध ‘जय श्री राम’ म्हटल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

उज्जैनमधील घटनेचा ‘हा’ व्हायरल व्हिडीओ

ते दोघे म्हणाले, “आता आम्ही खुश आहोत”

“आमच्या गावात येऊन कमावतोस कसा? परवानगी घेऊन येतोस का? मग ‘जय श्री राम’ बोलायला काय हरकत आहे? तुला ‘जय श्री राम’ म्हणावंच लागेल”, असं म्हणत त्या दोघांनी त्या मुस्लिम व्यक्तीचा हात पकडून ठेवला. त्यामुळे, अखेर त्या व्यक्तीने ‘जय श्री राम’ म्हणत “आता तुम्ही खुश आहात का?” असं विचारलं. त्यावर, ते दोघे “आता आम्ही खुश आहोत” असं म्हटलं. दरम्यान, आता या दोघांवरही कारवाई झाली आहे.

उज्जैन पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराबाबत म्हटलं आहे की, भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत संबंधित दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या त्यांची चौकशी केली जात आहे.

Story img Loader