MP Vishal Patil Lok Sabha Speech on Ladki Bahin Yojna : राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपध घेतली असून त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील केला आहे. नवं सरकार आल्यानंतर विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू झालं आहे. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या आधी राज्यातील जनतेला जी आश्वासनं दिली होती ती अद्याप पूर्ण होताना दिसत नाहीत. महायुतीच्या लोकांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपयांचा हप्ता देऊ, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, अद्याप ‘लाडक्या बहिणीं’ना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही. २,१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळेल याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी ‘लाडकी बहीण योजने’चा मुद्दा थेट संसदेत उपस्थित केला. संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या चालू आहे. यावेळी लोकसभेत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करत महायुतीला चिमटा काढला आहे.
हे ही वाचा >> “मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप; राष्ट्रवादीत जुंपली
‘लाडकी बहीण योजने’वरून विशाल पाटलांचा माहयुतीला चिमटा
विशाल पाटील सभागृहात म्हणाले, “नुकतीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली आहे आणि या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं आहे. त्याबद्दल मी महायुतीच्या नेत्यांचं आणि एनडीएचं अभिनंदन करतो. या निवडणुकीत भाजपाच्या लोकांनी ‘एक हे तो सेफ हैं’, ‘बटेंगे तो कटेंग’ अशा घोषणा दिल्या होत्या. महायुतीच्या लोकांना वाटतंय की या घोषणामुळे ते निवडणूक जिंकले आहेत. मात्र, त्यांनी विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण योजने’वरून जो काही प्रचार केला होता त्या योजनेमुळे त्यांचा विजय झाला आहे. त्यावेळी त्यांनी राज्यातील महिलांना सांगितलं की या योजनेद्वारे आम्ही महिलांना पैसे देत आहोत. मात्र, राज्यात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार आल्यावर, निवडणूक जिंकल्यावर आम्ही अधिक पैसे देऊ. मात्र अजून तरी तसं काही झालेलं नाही”.
हे ही वाचा >> “…तेव्हा यांनी कच खाल्ली”, भुजबळांचा राष्ट्रवादीपाठोपाठ महायुतीला टोला; लोकसभेतली खदखद अखेर बाहेर पडली
विशाल पाटील म्हणाले, “आम्हाला आणि राज्यातील महिलांना वाटत होतं की आता महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलं आहे. आता महाराष्ट्राला काहीतरी मिळेल. मात्र, तसं काही झालेलं दिसत नाही. केंद्राकडूनही काही मिळालेलं नाही. आमच्या मराठीत एक कविता आहे, येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा… पैसा झाला खोटा.. पाऊस आला मोठा..! तसंच काहीसं महाराष्ट्रात घडताना दिसत आहे. पैशाचा पाऊस पाडू असं म्हटलं, लाडकी बहीण योजना दाखवून महायुतीच्या लोकांनी मतांचा पाऊस पाडून घेतला. मात्र, आता त्यांचा पैसा खोटा झाला आहे. महिलांच्या पदरी निराशा पडली आहे. राज्यातील महिलांच्या व जनतेच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. अनेक योजनांतर्गत दिलं जाणारं अनुदान कमी करण्यात आलं आहे. खतांवरील जीएसटीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. शेतकरी आत्महत्या करतोय. परंतु, केंद्रातील सरकारला किंवा महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला त्याने काही फरक पडलेला दिसत नाही.