मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यात एका अजब शिक्षेचा प्रकार समोर आला आहे. आठवडाभर बेपत्ता असलेल्या महिलेची घरी परतल्यानंतर गावभर धिंड काढण्यात आली. मात्र, ही धिंड सुरू असताना महिलेनं तिच्या पतीला आपल्या खांद्यावर उचलून घ्यावं लागलं होतं.
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, ही महिला आपल्या सासरच्या मंडळींवर नाराज होती. आठवडाभरापासून ती बेपत्ता होती. तिच्या सासरच्यांना वाटलं महिलेचे कुठेतरी विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे तिला शिक्षा करण्याचा निर्णय सासरच्यांनी घेतला.
आठवडाभरानं बेपत्ता महिलेला घेऊन माहेरची मंडळी त्या महिलेच्या सासरी आली. मात्र, त्यांना रस्त्यातच अडवण्यात आलं. त्यानंतर तिची गावभर धिंड काढण्यात आली. यावेळी तिच्या खांद्यावर तिच्या पतीलाही बसवण्यात आलं होतं. या साऱ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर संपूर्ण प्रकरण समोर आलं.
हा प्रकार कल्याणपुऱा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या खेडा या गावात घडला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. “या प्रकरणात ८ जणांची ओळख पटली असून, ४ जणांना अटक करण्यात आली आहे,” अशी माहिती झबुआ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विनीत जैन यांनी दिली.