संसदेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांचे निलंबन केल्याने सर्व विरोधी पक्षांनी अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे विरोधी पक्षांसह अधिवेशन चालवू शकत नसल्याने खासदारांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी बिजू जनता दलाच्या खासदारांनी केली आहे.
ओदिशासह देशभरात पुरामुळे अतोनात नुकसान झाले असून यावर आपल्याला चर्चा करायची असल्याचे तथागत सत्पथी यांनी सांगितले. देशातील जनतेच्या प्रश्नांकडे पाहून लोकसभाध्यक्षांनी निलंबित खासदारांची शिक्षा कमी करावी, असे आवाहन केले आहे.
काँग्रेसच्या गोंधळी खासदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे.
अनेक खासदार मंगळवारी अनुपस्थित होते. विरोधी पक्ष हा लोकशाहीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांच्या अनुपस्थितीत संसदेचे कामकाज चालू शकत नसल्याकडे आपण लोकसभाध्यक्षांचे लक्ष वेधल्याचे सत्पथी यांनी सांगितले.
‘काळा दिवस’ला आक्षेप
खासदारांचे निलंबन केल्याने लोकशाहीसाठी हा काळा दिवस ठरला असल्याची प्रतिक्रिया सोनिया गांधींनी दिली होती. यावर भाजपचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आक्षेप घेतला.
काळा दिवस पाळून काँग्रेस लोकसभेचे कामकाज सुरळीत न चालू देण्याचा सुप्त अजेंडा राबवत असल्याची टीका नक्वी यांनी केली. इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादत खासदारांचे निलंबन केले होते, तो सोनेरी दिवस होता का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा