न्यायवैद्यक चाचणीच्या या अहवालामुळे भाजपला मोठी चपराक बसली आहे, अशी प्रतिक्रिया ‘कोएलिशन अगेन्स्ट जेनोसाइड’चे डॉ. शेख उबैद यांनी व्यक्त केली. मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळावा, यासाठी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर येऊन गेले, येथे येऊन त्यांनी त्यासाठी बरीच धडपड केली, मात्र या अहवालामुळे त्यांचे भिक्षापात्र रिकामेच राहिले आहे, असे ते म्हणाले. कोएलिशन अगेन्स्ट जेनोसाइड ही अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांची शिखर संस्था आहे.
नरेंद्र मोदी यांच्या व्हिसाबाबत लोकसभा आणि राज्यसभेच्या ६५ खासदारांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पाठविलेले पत्र बनावट नसल्याचे कॅलिफोर्निया येथे झालेल्या न्यायवैद्यक चाचणीत स्पष्ट झाले आहे. या पत्रातील काही स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती, मात्र हे पत्र अस्सल व अधिकृत असल्याचा निर्वाळा कागदपत्रांची न्यायवैद्यक चाचणी करणाऱ्या संस्थेने दिल्याने या वादावर पडदा पडला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भविष्यातही अमेरिकेचा व्हिसा देऊ नये, अशी विनंती करणारी दोन स्वतंत्र पत्रे लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांनी ओबामा यांना धाडली होती. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर व पाच डिसेंबर अश7ी दोन वेळा ही पत्रे पाठविण्यात आली होती, त्यानंतर २१ जुलैला पुन्हा हे पत्र ओबामा यांना पाठविण्यात आले. खासदारांनी या प्रकारची मागणी करणे हे देशाच्या सार्वभौमत्वाच्या मर्यादांचे उल्लंघन असल्याची टीका भाजप व अन्य काही पक्षांनी केल्याने हे प्रकरण वादग्रस्त ठरले होते. त्यातच डाव्या पक्षांचे सीताराम येचुरी, अच्युतन, द्रमुकचे के. पी. रामलिंगम यांच्यासह नऊ खासदारांनी या पत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचे सांगत आपल्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा दावा केल्याने या वादात भर पडली. या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी या पत्रांची न्यायवैद्यक चाचणी करावी तसेच ती हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासण्यात यावीत, अशी विनंती अमेरिकेतील कोएलिशन अगेन्स्ट जेनोसाइड या संस्थेने केल्याने कॅलिफोर्निया येथील प्रयोगशाळेत या तीन पानी पत्रांची तपासणी करण्यात आली. ही पत्रे अस्सल व अधिकृत असून त्यातील स्वाक्षऱ्या सलग, न थांबता व सफाईदारपणे केलेल्या आढळल्या. यातील एकही स्वाक्षरी बनावट आढळली नाही, असा अहवाल या प्रयोगशाळेने दिला.
या घडामोडींनंतर येचुरी यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही, मात्र रामलिंगम हे अद्याप आपल्या दाव्यावर ठाम आहेत. सध्या हे प्रकरण उपराष्ट्रपतींकडे सोपविण्यात आल्याने मी याबाबत अधिक बोलू इच्छित नाही, मात्र अशा कोणत्याही पत्रावर मी स्वाक्षरी केलेली नाही, असे ते म्हणाले, तर उत्तर भारतात निरपराध मुस्लीम तरुणांना पकडून त्यांना दहशतवादी ठरविण्याच्या पोलिसांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या एका पत्रावर आपण स्वाक्षरी केली होती, मोदी यांच्याबाबतच्या कोणत्याही पत्रावर मी स्वाक्षरी केलेली नाही, असे अच्युतन यांनी सांगितले.
मोदींबाबतचे पत्र बनावट नाही
न्यायवैद्यक चाचणीच्या या अहवालामुळे भाजपला मोठी चपराक बसली आहे, अशी प्रतिक्रिया ‘कोएलिशन अगेन्स्ट जेनोसाइड’चे डॉ. शेख उबैद यांनी व्यक्त केली.
First published on: 29-07-2013 at 03:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mps letters to obama on narendra modi visa original and authentic