नवी दिल्ली : लोकशाहीमध्ये सर्वोच्च स्थान असलेल्या संसद भवन परिसरात गुरुवारी भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांनी नैतिकतेची पायरी सोडली. एकमेकांवर धक्काबुक्की, मारहाणीचे आरोप करताना हे प्रकरण पोलीस ठाण्यातही पोहोचले. धक्काबुक्कीत जखमी झालेल्या भाजपच्या दोन खासदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाजपने मारहाणीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून गुरुवारी ‘इंडिया’ व रालोआ या दोन्ही आघाड्यांतील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे संसदेच्या आवारातील  वातावरण आधीच तापले होते. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याशेजारी काँग्रेस व इतर विरोधक खासदारांनी शहांविरोधात निदर्शने केली. त्यानंतर हे सर्व खासदार घोषणाबाजी करत मकरद्वारासमोर आले. त्यावेळी तिथे भाजपचे खासदार आधीच काँग्रेसविरोधात निदर्शने करत होते. दोन्ही बाजूंचे सदस्य आंबेडकरांचे छायाचित्र घेऊनच घोषणाबाजी करत होते. यावेळी दोन्हीकडील खासदार एकमेकांना भिडले. या गोंधळात राहुल गांधींनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी केला. सारंगी यांच्या चेहऱ्याला जखम झाली असून भाजपचेच मुकेश राजपूत यांनाही मुका मार लागला आहे. दोघांनाही राममनोहर लोहिया रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याचा आरोप फेटाळला. खाली कोसळलेल्या सारंगीची विचारपूस करण्यासाठी गेलो असता, ‘तुम्हाला लाज वाटत नाही का’, असा आरडाओरडा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला. भाजपच्या खासदारांनीही राहुल गांधींशी हुज्जत घातली.

हेही वाचा >>>Kangana Ranaut : “संसदेत जिम ट्रेनरप्रमाणे बायसेप्स दाखवत…”, कंगना रणौत यांचे राहुल गांधींवर गंभीर आरोप

मोदींकडून विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सारंगी व राजपूत यांची विचारपूस केली. दोघांवर उपचार करणारे डॉ. अजय शुक्ला यांना थेट मोदींनी फोन केला. त्यानंतर खासदारांना ‘चिंता करू नका’ असेही पंतप्रधानांनी सांगितले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान व प्रल्हाद जोशी यांनीही रुग्णालयात जाऊन खासदारांची विचारपूस केली. लोकशाहीमध्ये हाणामारीला जागा नसल्याची प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली.

खरगेंनाही धक्काबुक्की?

भाजपच्या खासदारांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला. मकरद्वारावर मला ढकलण्यात आले, माझा तोल गेल्यामुळे मी खाली पडलो, मला दुखापत झाली, असे खरगेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे.

राहुल गांधींवर महिला खासदाराचा आरोप

‘‘राहुल गांधी माझ्या अत्यंत जवळ येऊन उभे राहिले व त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ झाले,’’ असा आरोप नागालँडच्या भाजप महिला खासदार फान्गनॉन कोन्याक यांनी केला. कोन्याक यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहून राहुल गांधींची तक्रार केली. राहुल गांधींचे वागणे अत्यंत असभ्य होते. त्यांच्या या वागण्यामुळे माझ्या मान-सन्मानाला धक्का लागला, असा आरोपही कोन्याक यांनी पत्रात केला आहे.

भाजपच्या तक्रारीनंतर गांधींविरोधात गुन्हा

भाजप खासदार हेमंग जोशी यांच्यासह अनुराग ठाकूर आणि बांसुरी स्वराज यांनी दिलेल्या तक्रारीवरून संसद मार्ग पोलिसांनी रात्री उशिरा राहुल गांधींविरोधात गुन्हा नोंदविला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७ (शारिरीक इजा पोहोचविणे), १३१ (गुन्हेगारी शक्तीचा वापर), ३५१ (धमकाविणे) आदी कलमांखाली हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भाजपचे प्रताप सारंगी, मुकेश राजपूत जखमी

राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला. तो खासदार माझ्या अंगावर कोसळला व मला जखम झाली. – प्रताप सारंगी, भाजप खासदार

मला संसदेत जाण्यापासून रोखले. भाजपच्या खासदारांनी मला ढकलले. ते मला धमकीही देत होते. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा

(संसद भवनाच्या परिसरात झालेल्या गोंधळानंतर भाजपचे प्रताप सारंगी खाली कोसळले. राहुल गांधी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले असता भाजपच्या गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला.)

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mps scuffle outside parliament case filed against rahul gandhi amy