हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधील मध्यमवर्गीयांसाठी सर्वात मोठी घोषणा ठरली ती म्हणजे पाच लाखांपर्यंतचे करमुक्त उत्पन्न. गोयल यांनी पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आल्याची घोषणा संसदेमध्ये केली. गोयल यांनी ही घोषणा करताच लोकसभेत भाजपा खासदारांनी ‘मोदी मोदी मोदी’ अशा घोषणा दिल्या. मध्यमवर्गींयांना मोदी सरकारने निवडणुकांआधी दिलेला हा सर्वात मोठा दिलासा आहे. ३ कोटी करदात्यांना याचा फायदा होणार आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली हे उपाचारांसाठी परदेशात असल्याने हंगामी अर्थमंत्री म्हणून गोयल यांनी अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. ९० मिनिटांच्या या भाषणामध्ये त्यांनी मोदी सरकारने मागील चार वर्षांमध्ये केलेल्या कामाचा पाढा वाचला. शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, जवान, गरीब, मध्यमवर्गीय अशा सर्वांसाठी गोयल यांनी वेगवेगळ्या घोषणा केला. गोयल यांच्या भाषणादरम्यान मोदींनी अनेकदा बाक वाजवून अनुमोदन दिले. अनेक घोषणा केल्यानंतर मोदी हसताना दिसले.

अर्थसंकल्प सादर करताना शेवटच्या २० मिनिटांमध्ये गोयल यांनी करप्रणालीमधील बदलांसंदर्भात घोषणा करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी पहिलीच घोषणा करताना पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व मध्यमवर्गीयांना १०० टक्के करमुक्ती जाहीर केली. या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी बाक वाजवून हसू लागले. त्यानंतर संसदेमधील भाजपाच्या सर्व खासदारांनी ‘मोदी.. मोदी.. मोदी..’चा जयघोष केला. जवळजवळच एक ते दीड मिनिटांसाठी या घोषणा सुरु होत्या.

निवडणुकांच्या आधी कररचनेमध्ये सरकारकडून बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणेच मोदी सरकारने पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे.

Story img Loader