भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खादी वस्त्रोद्योगाला एक वेगळं महत्त्व होतं. पण आज खादी उद्योग खूप मागे पडला आहे. या उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून दिल्लीत खादी सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. एमएसएमई मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी खादी उद्योगाला चालना देण्याबाबत सुरू असलेल्या विविध प्रयोगाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी एमएसएमई आणि निफ्ट फॅशन डिझाइन क्षेत्रात काम करत आहे. त्यासाठी सर्वप्रथम त्यांचं कौतुक करतो. या क्षेत्रात काम करण्याची खूप मोठी संधी आहे. यामध्ये आधीपासूनच अनेक कंपन्या काम करत आहेत. जगात कपड्यांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत आपल्या खादीला देखील मागणी कशी वाढेल, त्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजेत.

त्यासाठी खादी कपड्यांचा दर्जा आणि त्याचं डिझाइनवर जास्तीत जास्त काम करायला हवं. सर्वच वयोगटातील लोक खादी कपड्याला पसंती कसे देतील, त्या अनुषंगाने प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी मार्केटींगचं खूप महत्त्व आहे. यामुळं आपलं काम आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतं. खादी कपडा कोणत्याही मोसमात वापरला जाऊ शकतो. याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही, असंही राणे यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एमएसएमई आणि निफ्टकडून खूप अपेक्षा आहेत. खादी उद्योगाला चालना मिळाल्याने रोजगारात देखील वाढ होईल. उत्पादन वाढवून निर्यात वाढवल्याने देशाच्या जीडीपीला देखील याचा फायदा होणार आहे, असंही ते म्हणाले.

दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथे खादी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली आहे. बेंगळुरू, गांधीनगर, कोलकाता आणि शिलाँग येथे याच्या उपशाखा आहेत. कपडे डिझाइन करणं, घरांसाठी पडदे बनवणं आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध प्रकारची वस्त्र बनवणं हा याचा मुख्य उद्देश आहे. गुणवत्ता, डिझाइन आणि व्यापाराच्या बाबतीत जागतिक मानकांनुसार सर्व प्रक्रियांचे पालन करणं हे देखील उद्दिष्ट आहे.

Story img Loader