बंगळूरु : म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (मुदा) घोटाळा प्रकरणातील तक्रारदारांपैकी एक प्रदीप कुमार एस. पी. यांनी गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर लोक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली.

लोकायुक्त पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती बी एम, मेहुणा मल्लिकार्जुन स्वामी आणि देवराजू (ज्यांच्याकडून मल्लिकार्जुन स्वामींनी जमीन खरेदी करून भेट दिली ) आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या यांच्या विरोधात चौकशी करण्यास दिलेली परवानगी उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर विशेष न्यायालयाचा हा आदेश आला.

हेही वाचा >>> किनारपट्टीवरील शहरांतील हवामान बदल नियमांच्या अंमलबजावणीत त्रुटी

ईडीने सिद्धरामय्या यांच्याविरोधात पोलिसांच्या एफआयआरसह सक्तवसुली प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) देखील नोंदवला आहे. त्यांच्या पत्नीला १४ भूखंडाचे वाटप करण्यात आलेल्या कथित अनियमिततेबद्दलचे हे प्रकरण आहे. मुदाने मंगळवारी सिद्धरामय्या यांच्या पत्नीला देण्यात आलेले १४ भूखंड परत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी मालकी आणि ताबा सोडण्याचा निर्णय घेतला. मुडाने या भूखंडांची विक्री करार रद्द करण्याचे आदेश दिल्याचे आयुक्त ए. एन. रघुनंदन यांनी सांगितले होते. त्याला तक्रारदारांपैकी एक असलेल्या कुमार यांनी आक्षेप घेतला होता.

न्यायालयाच्या परवानगीशिवाय मालमत्तेच्या स्थितीत कोणताही बदल करता येणार नसल्याचे कुमार यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच आरोपींना ताबडतोब अटक केली जावी. असे न केल्यास संपूर्ण प्रकरणातील पुरावे नष्ट केले जाऊ शकतात, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. शिवाय मुख्यमंत्री आणि इतरांविरुद्ध पुरावे नष्ट केल्याबद्दल तक्रार दाखल करण्याची विनंतीही त्यांनी ईडीला केली आहे. गुन्ह्यासंदर्भात ईसीआयआरच्या नोंदणी वेळची स्थिती कायम राखली जावी. तसेच यामुळे अधिकाऱ्यांना तपास सुरू ठेवता येईल आणि कायद्यानुसार आवश्यक ती पावले उचलता येतील, असे कुमार म्हणाले.

तक्रारदार ईडीसमोर साक्ष देण्यासाठी हजर

मुदा घोटाळा प्रकरणातील एक तक्रारदार असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या स्नेहमयी कृष्णा तपासासंदर्भात पुरावे देण्यासाठी तसेच नोंदी सादर करण्यासाठी गुरुवारी ईडीसमोर हजर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने समन्स बजावले असून काही कागदपत्रे मागितली आहेत. ती आपण देणार असल्याचे ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी कृष्णा यांनी पत्रकारांना सांगितले.

माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास सिद्धरामय्या

सिद्धरामय्या यांनी आपण सद्सद्विवेकबुद्धीनुसार काम करत असून सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त करत घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावले. म्हैसूर आणि राजघराण्यांची प्रमुख देवता चामुंडेश्वरी देवी मंदिराच्या आवारात आयोजित दहा दिवसीय दसरा उत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. भाजप आणि जेडीएस यांनी केलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी लोकांचा आणि चामुंडेश्वरीचा आशीर्वाद आपल्याला आहे तोपर्यंत कोणीही काहीही करू शकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच आपण कोणतीही चुकीची गोष्ट केली नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.