पीटीआय, नवी दिल्ली : ‘मुद्रा’ योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सामान्य माणसाच्या क्षमतेचे आकलन नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली. लघु आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी असलेल्या ‘मुद्रा’ कर्ज योजनेच्या माध्यमातून आठ कोटींपेक्षा जास्त नवीन उद्योजक तयार झाले आहेत, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, सरकारसाठी कारभार म्हणजे ‘कमाल तमाशा’ झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी रोजगार मेळाव्यामध्ये व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला.
या कार्यक्रमामध्ये निरनिराळय़ा खात्यांतील ७१ हजार ५०६ नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे देण्यात आली. ‘मुद्रा’च्या माध्यमातून २३ लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे कर्ज देण्यात आले असून लाभार्थीमध्ये ७० टक्के महिलांचा समावेश असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ‘मुद्रा’च्या माध्यमातून नवीन योजना आणि धोरणांच्या साहाय्याने नवीन भारत पुढे सरकत आहे, आपले सरकार तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांसाठी सक्रियपणे काम करत आहे. सरकारच्या धोरणांमुळे नवीन शक्यता राबवणे शक्य झाले आहे, त्याच वेळी प्रतिक्रियात्मक दृष्टिकोन भूतकाळजमा झाला आहे, असे ते म्हणाले. माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचे नाव न घेता, स्वत:ला अर्थतज्ज्ञ समजणारे या योजनेची खिल्ली उडवतात, अशी टीका मोदी यांनी केली. पन्नास हजारांपेक्षा कमी रकमेच्या कर्जामध्ये कोणता उद्योग सुरू करता येतो, असा प्रश्न चिदम्बरम यांनी अलीकडेच विचारला होता. आपले सरकार आल्यापासून विद्युतीकरण, रेल्वे, रस्ते, मेट्रो, विमानतळे अशा पायाभूत सुविधांशी संबंधित क्षेत्रांमध्ये प्रगती झाली आहे, असा दावा पंतप्रधानांनी केला. पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होते, असे ते म्हणाले.
सरकारसाठी कारभार म्हणजे ‘कमाल तमाशा’
काँग्रेसने मात्र या रोजगार मेळाव्यावर टीका केली आहे. या सरकारसाठी कारभार म्हणजे ‘कमाल तमाशा’ झाला आहे असे काँग्रेसध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. सरकारची नऊ वर्षे पूर्ण होत असताना नियुक्तीपत्रे देणे म्हणजे ‘उशिरा केलेली अपुरी उपाययोजना’ आहे, रोजगार मेळावे घेऊन नियुक्तीपत्रांचे वाटप करणे हा स्टंट आहे अशी टीका त्यांनी केली.