मुघल सम्राट अकबर महान नव्हते तर तर मेवाडचे राजे महाराणा प्रताप हे महान व्यक्तीमत्व होते, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यक्रमात गुरुवारी त्यांनी हे विधान केले.


योगी म्हणाले, महाराणा प्रताप यांनी विदेशी आणि अन्य धर्मियांना आम्ही आमचे बादशाह स्विकार करु शकत नाही, असे म्हटले होते. आदिवासी समाज आजही स्वतःला महाराणा प्रताप यांचे वंशज मानतो. महाराणा प्रताप यांचे जीवन आणि शौर्य यांमधून आपल्याला प्रेरणा मिळते.

महाराणा प्रताप यांनी आपल्याला बादशाह म्हणून स्विकारावे असा संदेश अकबरने राणा यांच्याकडे पाठवला होता. मात्र, अनेक प्रयत्नांनतरही महाराणा प्रताप यांनी विदेशी अकबरला बादशाह म्हणून स्विकारले नाही, असेही यावेळी योगी म्हणाले.

योगी म्हणाले, त्यावेळी अकबरसोबत आपला स्वाभिमान आणि सन्मान गहाण ठेवणारे राजेही होते. मात्र, महाराणा प्रताप यांनी स्वाभिमान, सन्मानाला आपल्या छोट्याशा राज्यासोबत जिवंत ठेवले. याच कारणामुळे ५०० वर्षांनंतरही लोक महाराणा प्रताप यांनी लक्षात ठेवतात. जर त्यांनी अकबरची अट मान्य केली असती तर आपण आज मेवाडला आपल्या स्वाभिमानाचे प्रतिक मानले असते. त्यामुळे महान अकबर नाही तर महाराणा प्रताप होते, ज्यांनी आपला स्वाभिमान टिकवून ठेवला.

Story img Loader