फोब्र्ज या नियतकालिकाने जाहीर केलेल्या अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत सलग सहाव्या वर्षी मुकेश अंबानी यांनी सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती होण्याचा बहुमान पटकाविला आहे. तर, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सलग चौथ्यांदा मॅक्सिकोमधील उद्योजक कालरेस स्लिम यांनी यादीतील अग्रस्थान कायम राखले आहे.
जगभरातील १२२६ व्यक्तींचा समावेश असलेली अब्जाधीश व्यक्तींची यादी फोब्र्जने जाहीर केली. यामध्ये भारतातील ५५ अब्जाधीशांचा समावेश आहे. मुकेश अंबानी, लक्ष्मी मित्तल यांच्याशिवाय, अझीम प्रेमजी, दिलीप संघवी, शशी आणि रवी रुईया, कुमारमंगलम् बिर्ला, सावित्री जिंदाल, सुनील मित्तल, शिव नदार, के. पी. सिंग आणि अनिल अंबानी यांचा समावेश आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकविणाऱ्या स्लिम  यांची एकूण संपत्ती ७३ अब्ज डॉलर इतकी आहे तर त्यांच्या मागोमाग दुसऱ्या स्थानी ६७ अब्ज डॉलर संपत्ती असलेले बिल गेटस् आहेत. स्पेनचे ऑर्टेगा ५७ अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानी आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या मुकेश अंबानी यांचा जागतिक क्रमवारीत २२वा क्रमांक असून त्यांची संपत्ती साडेएकवीस अब्ज डॉलर इतकी आहे.
विशेष म्हणजे मार्च २०१२ मध्ये भारतातील ४८ अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवणारे विजय मल्ल्या नव्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. आपल्याला अब्जाधीशांच्या यादीतून वगळल्यामुळे आपण लोकांच्या द्वेषभावनेपासून मुक्त राहू शकू आणि याबद्दल परमेश्वराचे आभार मानत, असल्याची प्रतिक्रिया मल्ल्या यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.