रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. २०२१ मध्ये मुकेश अंबानींना अधिक यशस्वी करण्यात काही पुस्तकांचाही वाटा आहे. ब्लूमबर्ग या न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, कोणत्या पुस्तकांमुळे त्यांना २०२१ हे वर्ष समजून घेण्यात मदत झाली आणि २०२२ ची तयारी कोणत्या पुस्तकांच्या आधारे करत आहात, असा प्रश्न मुकेश अंबानी यांना विचारण्यात आला होता. यावर अंबानींनी ५ पुस्तकांबद्दल सांगितले.

मुकेश अंबानी यांनी फरीद जाकरिया यांनी लिहिलेल्या ‘टेन लेसन्स फॉर अ पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्ड’ या पुस्तकाचा संदर्भ दिला. अंबानींच्या म्हणण्यानुसार, लेखकाने या पुस्तकात करोना महामारी आणि अलीकडच्या काळातील काही सर्वात विनाशकारी घटनांमधली काही समांतरे रेखाटली आहेत. त्यातून जागतिक संकटे अनेकदा अस्थिर जीवनशैली आणि कमकुवत प्रशासन संरचनांमुळे उद्भवतात, हे दर्शवण्याचा प्रयत्न लेखकाने केलाय.

दुसरे पुस्तक रे डॅलिओ यांनी लिहिलेले आहे. ‘प्रिन्सिपल्स फॉर डीलिंग विथ द चेंजिंग वर्ल्ड ऑर्डर: व्हाय नेशन्स सक्सेड अँड फेल’ असं या पुस्तकाचं नाव आहे. हे एक इंटरेस्टिंग पुस्तक असून त्यामध्ये ५०० वर्षांपेक्षा जास्त इतिहासात जगातील प्रमुख देशांचे यश आणि अपयश सातत्याने दाखवण्यात आले आहे.

तिसरे पुस्तक ‘द रॅगिंग २०२०: कंपनीज, कंट्रीज, पीपल अँड द फाईट फॉर अवर फ्युचर’ आहे. या पुस्तकाचे लेखक अॅलेक रॉस आहेत. अंबानी म्हणतात, की “हे पुस्तक अनेक दशकांपासून आधुनिक सभ्यतेला आधार देणारा सामाजिक करार (सरकार, व्यवसाय आणि लोकांमधला न बोललेला करार) डिजिटल युगात कशा मूलभूत बदलातून जात आहे, याचा सखोल विचार करायला लावतं.”

मौरो गुइलेन यांनी लिहिलेल्या ‘२०३०: हाऊ टुडेज बिगेस्ट ट्रेंड्स विल कोलायड अँड रीशेप द फ्युचर ऑफ एव्हरीथिंग’ या पुस्तकाबद्दल, मुकेश अंबानी म्हणतात, या पुस्तकात २०३० मधील जगाच्या स्थितीबद्दल, विशेषतः लोकसंख्याशास्त्रीय संभाव्य बदल आणि त्याचे जागतिक आर्थिक संभावनांवर संभाव्य परिणाम याबदल अंदाज बांधण्यात आले आहे.

‘बिग लिटल ब्रेकथ्रूज: हाऊ स्मॉल, एव्हरीडे, इनोव्हेशन्स ड्राईव्ह ओव्हरसाइज रिझल्ट्स’ हे पाचवे पुस्तक जोश लिंकर यांनी लिहिले आहे. अंबानींच्या मते हे पुस्तक उद्योजकांसाठी आवश्यक आहे.

Story img Loader