New Reliance Jio Chairman: रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी (२८ जून) रिलायन्स उद्योग समुहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली. यानुसार आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रिलायन्सने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी रिलायन्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीतच रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी आकाश अंबानी यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली. २७ जूनला मुकेश अंबानी यांनी तात्काळ अंमलबजावणीच्या प्रभावाने राजीनामा दिला. यानंतर आकाश अंबानींच्या नियुक्तीचा निर्णय झाला.
हेही वाचा : रिलायन्सचा मोठा निर्णय, ‘या’ अमेरिकेच्या मोठ्या कंपनीची खरेदी, भारतात बॅटरी तंत्रज्ञानात मोठे बदल होणार
रिलायन्स संचालक मंडळाने आकाश अंबानी यांच्याशिवाय इतरही काही नियुक्तीचे निर्णय घेतले आहेत. यानुसार, पंकज मोहन पवार यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. ही नियुक्ती ५ वर्षांसाठी आहे. रमिंदर सिंग गुजराल व के. व्ही. चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.