इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यात सध्या सुरू असलेल्या िहसाचाराबाबत भारत व्यथित आहे, कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाचा आम्ही निषेधच करतो, असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सांगितले. पॅलेस्टाइन व इस्रायल यांच्यातील वादावर शांततामय तोडगा काढण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुखर्जी हे इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती आहेत. इस्रायलचे अध्यक्ष रिवेन रिवलिन यांच्या निवासस्थानी मुखर्जी यांचे शाही स्वागत करण्यात आले. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी आताच्या हिंसाचारात दोन्ही बाजूंकडून शेकडो लोक मारले गेल्याची घटना दु:खदायक असल्याचे सांगितले. हिंसाचाराचे आपल्याला वाईट वाटते व कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाचा भारत निषेधच करतो असे त्यांनी स्पष्ट केले.

पॅलेस्टाईन येथे पूर्व जेरूसलेमच्या एका विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भारत इस्रायलविरोधी भूमिका घेत नसल्याबाबत फलक झळकावून निषेध केला होता. इस्रायली प्रसारमाध्यमांनी भारत पॅलेस्टिनी दहशतवादाचा निषेध करीत नाही, अशी भूमिका घेत राष्ट्रपती मुखर्जी यांनी पॅलेस्टाइन दौऱ्यातच असा निषेध करायला हवा होता असे सांगून अप्रत्यक्षपणे मुखर्जी यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी तीन दिवसांत जॉर्डन, पॅलेस्टाइन व इस्रायलचा दौरा केला.