कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारीला हृदयविकाराचा झटका आल्याने तो तुरुंगात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंरतु, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. मुख्तार अन्सारीवर १४ तासांपासून ९ डॉक्टरांचं पथक उपचार करत होतं. परंतु, त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं आणि उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा कुख्यात गुंड उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात शिक्षा भोगत होता.
दरम्यान, मुख्तारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा उमर अन्सारीने हा मृत्यू नसून हत्या असल्याचं वक्तव्य केलं आहे. उमर अन्सारी म्हणाला, आम्हीदेखील माणसंच आहोत. त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातून सत्य समोर येईल. परंतु, मला जे वाटतंय ते सांगून काही फायदा होणार नाही. माझ्या वडिलांना तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागातून थेट तुरुंगात दाखल करण्यात आलं. दरम्यान, मला माझ्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्यावर विषप्रयोग केला जात होता. त्यांना स्लो पॉइझन दिलं जात आहे.
मुख्तार अन्सारीचा भाऊ सिबगतुल्लाह अन्सारी म्हणाला, हे सगळ कट रचून केलं गेलं आहे. तुरुंगात घृणास्पद घटना घडली आहे. मुख्तारचा मृतदेह पाहून तो आजारी होता असं वाटत नाही. त्याच्याकडे पाहून वाटतंय की तो झोपला आहे. उमर सध्या बांद्यात आहे आणि कुटुंबातील इतर सदस्य घरी आहेत. हा कट रचणाऱ्यांना सांगायचं आहे की, अल्लाह हे सगळं पाहतोय. तुरुंगात सुरक्षितता नाही. मुख्तार अजून मेला नाही तो इथेच आपल्यामध्ये आहे. माझी फक्त इतकीच इच्छा आहे की, न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि चौकशी करावी. पोलीस प्रशासन सध्या केवळ टाईमपास करतंय.
मुख्तारवर ६१ अधिक गुन्हे
मुख्तार अन्सारीला २०२२ मध्ये शिक्षा झाली होती. त्यानंतर पुन्हा दोन प्रकरणात अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मुख्तार अन्सारीवर ६१ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. बांदा आणि गाजीपूर भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
हे ही वाचा >> “…तर देशभरात मोठा गदारोळ माजेल”, स्वतःच्या डीपफेक व्हिडीओचं उदाहरण देत पंतप्रधान मोदींचं AI बद्दल वक्तव्य
मुख्तार अन्सारी कोण होता?
मुख्तार अन्सारी पाच वेळा आमदार राहिला होता. अन्सारीवर ६१ पेक्षा जास्त गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. मुख्तार हा तुरुंगातूनही गँग चालवत असल्याचा त्याच्यावर आरोप केला जात होता. मुख्तारचा एक भाऊ विद्यमान खासदार आहे. उत्तर प्रदेश सरकारने मुख्तार अन्सारीवर कारवाई करत जवळपास ६०५ कोटींची संपत्ती जप्त केली होती. तसेच त्याचे अनेक बेकायदेशीर व्यवसाय सरकारने बंद केले आहेत.