सत्तेचे फायदे सत्ताधाऱयांच्या नातेवाईकांना कसे मिळतात, याचे एक उदाहरण छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या मेहुण्याच्या रुपाने पुन्हा एकदा पुढे आले आहे. छत्तीसगढ सरकारच्या अधिकृत फायलींवरील नोंदींमध्ये रमण सिंग यांचे मेहुणे संजय सिंग यांचा उल्लेख स्पष्टपणे ‘मुख्यमंत्री का साला’ असाच केला जात असल्याची माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केली आहे. एका फायलीमध्ये तर एका प्रशासकीय अधिकाऱयाने संजय सिंग यांच्या कृत्याचा उल्लेख करताना ‘मुख्यमंत्री के साले संजय सिंग का नया कारनामा’ असेच लिहिले आहे.
रमण सिंग यांनी डिसेंबर २००३ मध्ये छत्तीसगढच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी संजय सिंग हे तेथील पर्यटन विभागात तृतीय श्रेणीतील कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर काही वर्षातच त्यांना दोन पदोन्नती देण्यात आल्या. सुरुवातीला त्यांना पर्यटन विभागात सहायक महाव्यवस्थापक आणि नंतर थेटपणे महाव्यवस्थापक पदावर पदोन्नती देण्यात आली. या दोन्ही पदोन्नती बेकायदा ठरविण्यात आल्यानंतर त्यांना वाहतूक सहआयुक्त पदावर नेमण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे विविध आरोप झाले आणि त्यांची चौकशीही सुरू झाली.
छत्तीसगढमधील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेश सिंग यांनीही संजय सिंग यांना मिळालेल्या विशेष फायद्यावर टीका केली. कॉंग्रेसचे आमदार कवासी लख्मा यांनीही रमण सिंग यांना या विषयावर हळूवार चिमटे काढताना मेहुण्यावर इतकी मेहरबानी करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, संजय सिंग यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तर मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या कार्यालयाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये संजय सिंग यांचा मुख्यमंत्री कार्यालयाशी कसलाही संबंध नसल्याचे म्हटले आहे. जर त्यांनी काही चुकीचे केलेले आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही म्हणण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त वाचा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा