केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे गेल्या वर्षीपासून ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना’चे औचित्य साधून व्यसनमुक्ती आणि जनजागृती या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना वा संस्थांचा राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यंदा हा पुरस्कार मुक्ता पुणतांबेकर यांच्या नेतृत्वाखाली मुक्तांगणमध्ये सुरू झालेल्या ‘प्रादेशिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्रा’ला जाहीर झाला असून, २६ जून रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी मुक्ता पुणतांबेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह आणि चार लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
एप्रिल २००० मध्ये हे प्रशिक्षण केंद्र सुरु झाले असून, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, दीव-दमण, आणि छत्तीसगड या राज्यातील ९० आणि नव्याने सुरु होणाऱ्या प्रत्येक व्यसनमुक्ती केंद्रातील वॉर्ड कर्मचारी, नर्स, डॉक्टर, समुपदेशक यांना प्रशिक्षण देणे, ही महत्वाची जबाबदारी या केंद्रावर सोपवण्यात आली होती. त्याचबरोबर, सर्वेक्षण, वस्तीस्तरावर व्यसनमुक्ती आणि एड्स निर्मूलन प्रकल्प या सर्व उपक्रमांची अमलबजावणी तसेच सर्व केंद्रांसाठी किमान गुणवत्ता निकष ठरवणे अशा जबाबदाऱ्या मुक्तांगण प्रशिक्षण केंद्रावर सोपवण्यात आल्या होत्या.
या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत दरवर्षी सरासरी १५० जनजागृती कार्यक्रम व प्रशिक्षण शिबिरे केंदातर्फे आयोजित केली जातात.  ‘ या केंद्राचे आतापर्यंतचे वेगवेगळे समन्वयक , अधिकारी, कर्मचारी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची सबंध टीम, आणि कार्यशाळेतील प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्वाना सकस आहार देणाऱ्या सहचरी या सर्वाच्या वतीने हा सन्मान मी स्वीकारला आहे.’ अशी प्रतिक्रिया  पुणतांबेकर यांनी दिली. पुरस्काराची रक्कम आधुनिक सुविधांनी युक्त प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या कामी वापरली जाणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. गेल्यावर्षी हा पुरस्कार मुक्तांगणचे संस्थापक संचालक डॉ. अनिल अवचट यांना दिला गेला होता.