बलात्कारप्रकरणातील दोषींच्या शिक्षेसंदर्भातील वादग्रस्त विधानावर टीकेची झोड उठल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी सारवासारवीचे प्रयत्न सुरू केले आहेत. समाजवादी पक्षात स्त्रियांचा जितका सन्मान केला जातो तेवढा अन्यत्र कुठेही केला जात नसल्याचे सांगत मुलायमसिंह यांनी आपल्या वक्तव्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. बलात्कारविरोधी कायदे सौम्य करण्याची गरज असून मुलांकडून कधीकधी चुका होतात, असे धक्कादायक विधान मुलायमसिंह यादव यांनी मोरादाबाद येथील जाहीर सभेत केले होते. तसेच ‘मुले ही मुले असतात आणि कधीकधी त्यांच्याकडून चूक होते. त्यासाठी त्यांना फासावर चढविणे योग्य नव्हे’, अशी मुक्ताफळे त्यांनी या सभेत उधळली होती. मुलायम यांच्या या विधानामुळे देशभरातून त्यांच्याविरुद्ध टीकेची झोड उठली होती. या विधानाची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाकडून मुलायमसिंह यादव यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, आपण केलेल्या विधानात कोणतीही चूक नसून, माझ्या विधानाची देशभरात चर्चा होत असून हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण असल्याचे मुलायमसिंह यादव यांनी सांगितले.
वादग्रस्त वक्तव्यानंतर मुलायमसिंहांची सारवासारव
बलात्कारप्रकरणातील दोषींच्या शिक्षेसंदर्भातील वादग्रस्त विधानावर टीकेची झोड उठल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी सारवासारवीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
First published on: 11-04-2014 at 07:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mulayam attempts damage control ncw sents notice