बेनीप्रसाद वर्मा यांची टीका
जातीयवादी शक्तींना बळ देण्यासाठी सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांनी भाजपशी जवळीक साधल्याचा आरोप केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केला आहे. हिंमत असेल तर मुलायमसिंह यांनी बाबरी मशिदीच्या प्रश्नावर जाहीर चर्चेसाठी यावे, असे आव्हानही वर्मा यांनी आपल्या एकेकाळच्या मित्राला दिले.
राम मंदिराच्या प्रश्नावरून तणाव निर्माण करून भाजप राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्याचा लाभ भाजप आणि सपालाच होणार आहे, असेही वर्मा म्हणाले. लखनऊ आणि फरिदाबाद न्यायालयात २००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी खलिद मुजाहिद याचा कोठडीत मृत्यू झाला त्याची एनआयएमार्फत चौकशी करण्याची मागणी सपाने का केली नाही, असा सवालही त्यांनी केला. या हल्ल्यांमागे उजव्या हिंदू संघटनांचा हात असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
मुलायमसिंह यांनी बाबरी मशिदीच्या प्रश्नावर चर्चेसाठी समोरासमोर यावे, आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ आणि त्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हानही वर्मा यांनी मुलायमसिंह यांना दिले. उत्तर प्रदेशात सपाचे सरकार आहे, त्यांनी केंद्र सरकारला बाबरी प्रश्नाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस करावी, असेही वर्मा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

Story img Loader