उत्तर प्रदेशात महिला व मुलींवर बलात्काराच्या घटना रोजच्या रोज घडत असताना समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी मात्र उत्तर प्रदेशात लोकसंख्येच्या तुलनेत बलात्कारांची संख्या कमी असल्याचा दावा केला आहे.
 ते म्हणाले की, उत्तर प्रदेशची लोकसंख्या २१ कोटी आहे. जर देशात सर्वात कमी बलात्कार कुठल्या राज्यात होत असतील तर ते  उत्तर प्रदेशात होतात. राज्यात प्रत्येक गुन्ह्य़ावर लक्ष्य ठेवणे शक्य नाही असे ते म्हणाले. लखनौ येथे मोहनलालगंज येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचा मृतदेह नग्नावस्थेत टाकून दिल्याच्या प्रकरणी विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. समाजवादी पक्षाचे नेते नरेश आगरवाल यांनीही मुलायमसिंग यांची बाजू लावून धरताना सांगितले की, स्वातंत्र्यानंतर कुठलेही असे राज्य नाही जिथे गुन्हे घडले नाहीत. हे केवळ बलात्कारांच्या बाबतीत नाही तर कुठलेही सरकार गुन्हे कायमचे थांबवू शकत नाही, मग राज्यात कुणाचे सरकार आहे याच्याशी त्याचा संबंध नाही. आगरवाल असे म्हणाले की, महिलांविरोधातील गुन्हे देशात घडत आहेत. उत्तर प्रदेशात ते होतात असे नाही. बंगळुरू येथे काय घडले ते पाहा. भारतात आता हे प्रकार म्हणजे एक कल झाला आहे व सरकारने त्यावर आत्मपरीक्षण करायला पाहिजे.