बेनीप्रसाद वर्मा यांचा आरोप
केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा व समाजवादी पक्ष यांच्यात चांगलीच जुंपली असून मुलायमसिंग यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत केवळ चार जागा मिळतील व त्या पक्षाची अंत्ययात्रा काढायची वेळ येईल असे विधान बेनीप्रसाद वर्मा यांनी केले. समाजवादी पक्षाने वर्मा यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली असतानाच वर्मा यांनी पुन्हा एकदा मुलायम यांना चिमटा काढला आहे. लखनौ येथे बेनीप्रसाद वर्मा यांनी असा आरोप केला की, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी अल्पसंख्याकांना फसवले असून त्यांचे भाजपशी साटेलोटे आहे. समाजवादी पक्षाचे नेते रामाश्रय कुशवाह यांनी सांगितले की, बेनीप्रसाद यांचे डोके फिरले असून त्यांना सरकारमधून काढून टाकावे.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी असे सांगितले की, बेनीप्रसाद यांचे पुत्र राकेश हे विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत झाले आहेत त्याच्या रागापोटी त्यांनी मुलायमसिंग यांच्यावर टीका केली आहे. बेनीप्रसाद यांना ताबडतोब सरकारमधून काढावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे सरचिटणीस रामाश्रय कुशवाह यांनी केली. वर्मा यांचा मुलगा दोनदा समाजवादी पक्षाकडून विधानसभेला पराभूत झाला ते स्वत: अयोध्येतून ४०० मतांनी हरले म्हणून त्यांनी हे आरोप केले आहेत. ते काँग्रेसला महत्त्वाचे असतील आम्हाला नाही. त्यांचे मत ही काँग्रेसची भूमिका नाही.
कुशवाह म्हणाले की, बेनीप्रसाद यांचे डोके फिरले आहे. सर्व पक्षांना मिळून ८० जागा मिळतील असे वक्तव्य त्यांनी केले प्रत्यक्षात उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत.
गोंडा मतदारसंघाचे खासदार असलेल्या बेनीप्रसाद यांनी सांगितले की, मुलायमसिंग यांनी अल्पसंख्याकांना फसवले असून त्यांचे भाजपशी साटेलोटे आहे. १९९८ पासून अडवाणी व मुलायम यांचे साटेलोटे असून त्यामुळेच २००३ मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार अवघ्या १३५ आमदारांवर स्थापन होऊ शकले. १९९८ मध्ये वाजपेयी सरकार एक मताने पडले तेव्हा मुलायम यांनी सोनिया गांधी यांना पाठिंब्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर लगेच रात्री मुलायम यांचे अडवाणी यांच्याशी जया जेटली यांच्या निवासस्थानी बोलणे झाले त्यांनी लालकृष्ण अडवाणींना आपण सरकार बनवणार नाही असे आश्वासन मागितले व त्याबदल्यात सोनियांना पाठिंबा द्यायचा नाही, ही भाजपची अट मान्य केली.
बेनीप्रसाद यांची हकालपट्टी करा
केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा आणि समाजवादी पक्षातील शाब्दिक युद्ध पुन्हा एकदा चांगलेच पेटले आहे. मुलायमसिंह यांच्या नेतृत्वाखालील सपाच्या निवडणुकीतल भवितव्याबाबत बेनीप्रसाद यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सपाने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.
बेनीप्रसाद वर्मा यांच्यासारख्या नेत्यांच्या बेताल वक्तव्यांचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागणार असल्याचे सपाने म्हटले असून वर्मा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशातील विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक भवितव्याबाबत बोलताना बेनीप्रसाद वर्मा यांनी, पुढील लोकसभा निवडणुकीत मुलायमसिंह यांचा पक्ष केवळ चारच जागा जिंकेल आणि त्यामुळे पक्षाची अन्त्ययात्रा निघेल, असे वक्तव्य केले.
विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुकीत बेनीप्रसाद वर्मा यांचा पुत्र राकेश याला सपाकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचा आमच्या पक्षावर राग असल्याचे सपाचे सरचिटणीस रामगोपाळ यादव यांनी म्हटले आहे.