गुजरातमध्ये २००२ साली उसळलेल्या दंगलीनंतर पीडितांना न्याय मिळाला नव्हता. मात्र, आमच्या राज्यात तसे होणार नाही. दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून दिला जाईल. त्याचबरोबर दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
मुझफ्फरनगरमध्ये उसळलेल्या दंगलीमुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रीय लोक दलाने उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. गुजरातमधील २००२ मधील दंगलीची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशमध्ये होत असल्याची टीका या दोन्ही पक्षांनी समाजवादी पक्षावर केली. त्याला मुलायमसिंह यादव यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, गुजरातमध्ये पीडितांना न्याय मिळाला नव्हता. उत्तर प्रदेशात असे घडणार नाही. जातीचे आणि धर्माचे राजकारण करायला मला आवडत नाही. दंगलीतील दोषींवर कडक कारवाई केली जाईल आणि पीडितांना आम्ही जास्तीत जास्त मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी गुजरातमध्ये मोदींनी जे केले, तेच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष करीत आहे, अशी टीका राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंह यांनी केली होती. त्याला मुलायमसिंह यांनी उत्तर दिले आणि ही टीका साफपणे फेटाळून लावली.

Story img Loader